धक्कादायक..! मध्यप्रदेश एटीएस पथकाकडून औरंगाबादेत सर्च मोहीम; अलसुफा दहशतवादी संघटनेचे औरंगाबाद कनेक्शन असल्याची शक्यता

औरंगाबाद : ‘अलसुफा’ या दहशतवादी संघटनेचे औरंगाबाद कनेक्शन समोर आले आहे.  मध्यप्रदेश एटीएस पथकाने तीन दिवस शहरातील सातारा, खुलताबाद परिसरात सर्च मोहीम चालवली होती. मात्र, काहीच हाती न लागल्याने १४ एप्रिल रोजी हे पथक परत फिरले आहे. एका खाजगी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, मध्यप्रदेश एटीएस पथकाने गेल्या तीन दिवसांपासून शहरातील सातारा, खुलताबाद परिसरात सर्च मोहीम चालविली होती. राजस्थान पोलिसांनी जयपूर येथील चित्तोडगढ भागातून तीन संशयितांना ३० मार्च रोजी अटक केली होती. या संशयितांच्या ताब्यातून स्फोट घडविण्यासाठी वापरण्यात येणारे घातक रसायन जप्त करण्यात आले. तपासणी केली असता सदर रसायन हे महाराष्ट्रातून आणल्याचे उघडकीस आले. तर चौकशीत आरोपींपैकी दोघे जण हे नागपूरमार्गे औरंगाबाद शहरात येऊन थांबले होते. अशी माहिती समोर आली आहे.

या प्रकरणाचा तपास राजस्थान एटीएस पथक करीत असताना पकडण्यात आलेले संशयित आरोपी हे मध्य प्रदेशातील रतलाम येथील असल्याने त्यांना पुढील चौकशीसाठी मध्य प्रदेश एटीएसकडे सुपूर्द करण्यात आले होते. या दरम्यान दोघांनी सातारा परिसरात भाड्याने घर घेतले होते. त्यानंतर त्यांनी चार ते पाच दिवस खुलताबाद परिसराची देखील रेकी केली. वेरूळ आणि अजिंठा परिसरातही ते जाऊन आले, असे मध्य प्रदेश एटीएसच्या तपासात समोर आले आहे. याबाबतचे पुरावे जमा करण्यासाठी मध्य प्रदेश एटीएसचे विशेष पथक औरंगाबादेत गेल्या तीन दिवसांपासून मुक्काम ठोकून होते. तर या संघटनेची पाळेमुळे औरंगाबादेतही रुजल्याचा संशय मध्य प्रदेश एटीएसला आहे. ज्या परिसरात संशयितांनी वास्तव्य केले, त्या परिसरातून किराणा दुकानदार, घरमालक, शेजाऱ्यांचे जबाबही मध्य प्रदेशच्या एटीएसच्या अधिकाऱ्यांनी नोंदविले आहेत.

Share