उद्धव ठाकरे महाराष्ट्राला लागलेला शनी!

मुंबई : ‘मातोश्री’वर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याच्या तयारीत असलेल्या खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांचे निवासस्थान असलेल्या खार येथील इमारतीला शिवसैनिकांनी वेढा घातला आहे. त्यानंतर राणा दाम्पत्याने घरातूनच ‘फेसबुक लाईव्ह’ करत शिवसेनेवर व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला लागलेला शनी आहे, असे वक्तव्य आ. रवी राणा यांनी केले आहे, तर उद्धव ठाकरे म्हणजे बिनकामी पूर्ण पगारी मुख्यमंत्री असल्याची बोचरी टीका खा. नवनीत राणा यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता शिवसैनिक आणखीनच आक्रमक झाले आहेत.

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा राणा दाम्पत्याने दिला आहे. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी बॅरिकेडिंग तोडून राणा दाम्पत्याच्या खार येथील इमारतीच्या आवारात घुसून जोरदार घोषणाबाजी करीत राणा दाम्पत्याला ‘मातोश्री’कडे जाण्यापासून रोखले आहे. त्यानंतर राणा दाम्‍पत्याने खारमधील आपल्या निवासस्थानी देवघरात पूजा करतानाचा व्हिडिओ शेअर करत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

शिवसैनिकांकडून गुंडगिरी सुरू -रवी राणा
‘मातोश्री’ हे आमचे हृदयस्थान आहे. बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहेत. त्या ठिकाणी जाऊन आज आम्ही हनुमान चालिसा वाचणार आहोत. शनिवारचा दिवस हा बजरंगबलीचा दिवस आहे. महाराष्ट्राच्या शांतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून राज्याला जो शनी लागलाय तो आम्हाला या ठिकाणी संपवायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सुख, शांती असावी. महाराष्ट्राची उन्नती झाली पाहिजे, या उद्देशाने हनुमान चालिसा वाचण्यासाठी जर आम्हाला इतका विरोध केला जातोय. मराठी माणसाला हनुमान चालिसा वाचण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेचा दुरुपयोग करून करतायत, असा आरोप आ. रवी राणा यांनी केला आहे. शिवसैनिकांकडून गुंडगिरी सुरू आहे. आमच्या घरावर हल्ला होतोय, पोलिस आम्हाला तेथे जाण्यापासून रोखत आहेत. तरीही आम्ही ‘मातोश्री’वर जाणारच, असे सांगून आ. राणा म्हणाले, शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालले पाहिजे. आता बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक उरले नाहीत. बाळासाहेबांचे शिवसैनिक असते तर आम्हाला ‘मातोश्री’वर जाऊ दिले असते.

उद्धव ठाकरे म्हणजे बिनकामी पूर्ण पगारी मुख्यमंत्री -खा. नवनीत राणा
उद्धव ठाकरे म्हणजे बिनकामी पूर्ण पगारी मुख्यमंत्री असल्याची बोचरी टीका खा. नवनीत राणा यांनी केली आहे. आम्हाला घरामध्ये बंद करून ठेवले आहे. आमच्या घराबाहेर एवढे लोक जमले आहेत, त्यांना काहीही बोलले जात नाहीत. त्यांना का रोखले नाही? आम्हाला घराबाहेर का जाऊ दिले जात नाही? असा सवाल करून खा. राणा यांनी पोलिसांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप केला आहे. गेली दोन वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात गेले नाहीत; पण काल ते ‘मातोश्री’ परिसरात शिवसैनिकांना भेटले. त्यानंतर ‘मातोश्री’वर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठकही झाली. याच बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आमच्या घरावर हल्ला करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री ठाकरे हे सध्या फक्त कोणाला आत टाकायचे, कोणावर कोणती केस करायची, हेच काम करत आहेत. कालपासून आमच्या इमारतीच्या परिसरात असलेल्या बॅरिकेड्सला कोणीही टचही केले नव्हते. मग आज शिवसैनिक बॅरिकेड्स तोडून आत कसे काय शिरले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

आम्ही’ मातोश्री’बाहेर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्यावर ठाम आहोत. आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. तुम्ही पूर्वजांच्या जिवावर जगत असाल; पण आम्ही इथपर्यंत स्वत:च्या ताकदीवर आलो आहोत. मी आता घराबाहेरही पडणार आहे. ‘मातोश्री’वर जाईन. यानंतर कायदा-सुव्यवस्था बिघडली तर त्याची जबाबदारी ही सरकारची असेल, असेही खा. नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

Share