धक्कादायक ! एकाच कुटुंबातील नऊ जणांची सामूहिक आत्महत्या

सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आई, बायको, मुलगा, मुलगी अशा एकूण नऊ जणांनी विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये डॉक्टर, शिक्षकांचा समावेश आहे. आर्थिक विवंचनेतून या सर्वांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

पशुवैद्यकीय डॉक्टर माणिक यल्लप्पा वनमोरे आणि त्यांचा शिक्षक भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे यांच्यासह या दोघांच्या आई, पत्नी आणि मुलांचा मृतांमध्ये समावेश आहे. डॉ. माणिक यलाप्पा वनमोरे, त्यांची आई अक्काताई यल्लप्पा वनमोरे, पत्नी रेखा माणिक वनमोरे, मुलगी प्रतिमा माणिक वनमोरे, मुलगा आदित्य माणिक वनमोरे, डॉ. माणिक वनमोरे यांचा शिक्षक भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे, पोपट वनमोरे यांची पत्नी अर्चना वनमोरे, मुलगी संगीता पोपट वनमोरे आणि मुलगा शुभम पोपट वनमोरे अशी मृतांची नावे आहेत.

मिरजपासून साधारण १२ किलोमीटर अंतरावर म्हैसाळ गाव असून, येथील नरवाड रोडवरील अंबिकानगरमध्ये चौंडजे मळा भागात डॉ. माणिक वनमोरे हे आपल्या कुटुंबीयासह वास्तव्यास होते, तर त्यांचा शिक्षक भाऊ पोपट वनमोरे हे हॉटेल राजधानी कॉर्नर परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होते. रविवारी रात्री डॉ. माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे या दोन सख्ख्या भावांनी आपल्या कुटुंबातील नऊ सदस्यांसह एकाच वेळी विष पिऊन आत्महत्या केली.

सोमवारी सकाळी उशिरापर्यंत वनमोरे यांच्या घराचा दरवाजा उघडला नव्हता. त्यामुळे दवाखान्यातील कर्मचारी तसेच आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी त्यांना मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर वनमोरे कुटुंबातील नऊ जणांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. डॉ. माणिक वनमोरे, त्यांची पत्नी रेखा माणिक वनमोरे, आई अक्काताई यल्लप्पा वनमोरे, मुलगी प्रतिमा माणिक वनमोरे, मुलगा आदित्य माणिक वनमोरे, पुतण्या शुभम पोपट वनमोरे यांचे मृतदेह राजधानी हॉटेलजवळ असलेल्या घरात तर दुसरीकडे घरात डॉ.माणिक यांचा भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे, संगीता पोपट वनमोरे, अर्चना पोपट वनमोरे यांचे मृतदेह आढळून आले.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक वीरकर, पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेंदरे यांनी फौजफाटा घेऊन घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून नऊ जणांचे मृतदेह मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मिरज येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन सुरू आहे. शवविच्छेदनानंतर या नऊ जणांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक माहितीनुसार आर्थिक कारणांमुळे वनमोरे कुटुंब तणावात होते आणि नैराश्यातून या कुटुंबातील नऊ जणांनी एकत्रित आत्महत्या केल्याची माहिती आहे. संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

Share