मुंबई : छोट्या पडद्यावरील स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. अटीतटीच्या या लढतीत ठाणे येथील शुद्धी कदम हिने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली, तर सार्थक शिंदे आणि राजयोग धुरी हे उपविजेते ठरले. सायली ठाक तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली.
‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ कार्यक्रमात शुद्धी कदम, राजयोग धुरी, सार्थक शिंदे, सिद्धांत मोदी, राधिका पवार आणि सायली टाक या सहा स्पर्धकांमध्ये अंतिम लढत रंगली. त्यात शुद्धी कदम हिने बाजी मारत विजेतेपद पटकावले. विजेती शुद्धी कदमला चार लाखांची रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सार्थक शिंदे आणि राजयोग धुरी हे दोघे उपविजेते ठरले. सायली ठाक तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. सिद्धांत मोदी आणि राधिका पवार यांना उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गौरवण्यात आले.
विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना शुद्धी कदम भावूक झाली होती. माझ्यासाठी हा दिवस स्वप्नवत असल्याची भावना तिने व्यक्त केली. ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ च्या महाअंतिम सोहळ्यात सामील होण्यासाठी शुद्धीने बरीच मेहनत घेतली होती. महाअंतिम सोहळ्यात तिने उत्तम सादरीकरण केले आणि तिच्या गळ्यात विजेतेपदाची माळ पडली. इतक्या दिवसांच्या मेहनतीचे फळ मिळाल्यामुळे शुद्धी कदम आणि तिचे कुटुंबीय आनंदात आहेत. शुद्धी कदम हिने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे. ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ च्या मंचावर तिला गाण्याचे वेगवेगळे प्रकार सादर करता आले. या मंचाने सचिन पिळगावकर, वैशाली सामंत, आदर्श शिंदे, अविनाश-विश्वजीत गुरुच्या रुपात दिले. या गुरुंकडून मला खूप काही शिकायला मिळाल्याची भावना शुद्धीने व्यक्त केली.