राणा दाम्पत्याकडून जामिनाच्या अटींचे उल्लंघन; सरकार न्यायालयात जाणार

मुंबई : तुरुंगात बारा दिवस राहून नुकतेच जामिनावर सुटलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. राणा दाम्पत्याने माध्यमांशी बोलून न्यायालयाने जामीन देताना घातलेल्या अटींचे उल्लंघन केल्याचे सरकारी पक्षाने म्हणणे आहे. यावरूनच राणा दाम्पत्याच्या जामिनाला राज्य सरकार न्यायालयात आव्हान देणार आहे.

मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठणाचा अट्टाहास धरल्यामुळे तुरुंगवारीची वेळ ओढवलेले खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलायचे नाही, पोलिस तपासात अडथळे आणायचे नाहीत, घटनेशी संबंधित साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे दबाव आणायचा नाही आणि त्यांना प्रलोभने दाखवून त्यांच्यावर प्रभाव टाकायचा नाही आणि पुन्हा अशा प्रकारच्या गुन्ह्यात सहभाग घ्यायचा नाही, अशा अटी जामीन मंजूर करताना न्यायालयाने घातल्या होत्या. राणा दाम्पत्याने या अटी कबूलही केल्या होत्या. मात्र, तुरुंगात बाहेर पडल्यापासून राणा दाम्पत्य पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आग ओकताना दिसत आहे.

खा.नवनीत राणा यांनी तर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले होते. उद्धव ठाकरे यांनी कुठलाही मतदारसंघ निवडावा, मी तुमच्याविरोधात निवडणुकीत उभी राहीन, असे जाहीर आव्हान नवनीत राणा यांनी दिले होते. तसेच हनुमान चालिसा म्हणणे गुन्हा असेल तर १४ दिवसच काय १४ वर्षे तुरुंगात राहायला तयार आहे, असे सांगत नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा तापवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नवनीत राणा यांची हीच वक्तव्यं आता त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राणा दाम्पत्याने न्यायालयाने घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे सरकारी वकील प्रदीप घरत सोमवारी सत्र न्यायालयात या विरोधात दाद मागणार आहेत. न्यायालयाला त्यांचा युक्तिवाद पटल्यास राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

आम्ही कोर्टाचा कोणताही अवमान केलेला नाही -आ. रवी राणा
दरम्यान, यावर आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचा खूप मोठा प्रश्न आहे. ओबीसींवर खूप मोठा अन्याय होत आहे. न्यायालयांमध्ये महाराष्ट्राचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचे अनेक महत्त्वाचे विषय बाजूला ठेवून नवनीत राणा आणि रवी राणा यांचा जामीन रद्द करण्यासाठी कोर्टात जाऊन ताकद लावत आहेत. मात्र, आम्ही कोर्टाचा कोणताही अवमान केलेला नाही.

मुख्यमंत्र्यांनी जे षडयंत्र केले ते माध्यमांमध्ये यायला हवे
आ. रवी राणा म्हणाले, अनेक शिवसेना नेत्यांनी नवनीत राणा नाटक करत असल्याचा आरोप केला. नवनीत राणा आणि मला तुरुंगात टाकले जाते आणि तरीही शिवसेनेचे नेते नाटक करत आहेत, असे बोलत आहेत. मागील तीन दिवस नवनीत राणा यांच्यावर उपचार झालेत. ते जनतेपर्यंत पोहचले आहे. आमच्यावर जो अन्याय झाला, मुख्यमंत्र्यांनी जे षडयंत्र केले ते माध्यमांमध्ये यायला हवे.

लॉकअपमधील रात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यंतचा व्हिडीओ रिलीज करा
जर त्यांना नवनीत राणा यांनी नाटक केले असे वाटत असेल तर त्यांनी सांताक्रूझ पोलिस ठाण्याच्या लॉकअपमधील रात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यंतचा व्हिडीओ रिलीज करावा, अशी मागणी आ. रवी राणा यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.

Share