स्मार्ट सिटीची ६६0 कोटींची कामे ‘या’ महिन्यात होणार सुरु

औरंगाबाद : स्मार्ट सिटी अभियानातील सुमारे ६३५ कोटींच्या कामाच्या निविदा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने अंतिम केल्या आहेत. त्यात ३१७ कोटी रुपयांचे १११ रस्ते, स्मार्ट हेल्थ सेंटर, स्मार्ट स्कूल, सफारी पार्कचा टप्पा दोन, तीन, संत तुकाराम सिडको नाट्यगृहाचे नूतनीकरण यासह इतर कामांचा समावेश आहे. ही कामे मे महिन्यात सुरू होतील, कंत्राटदारांना अनामत रक्कम भरण्यासाठी रविवारपर्यंत मुदत दिली आहे. अशी माहिती प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली आहे.

स्मार्ट सिटी अभियानातील कामांच्या ३१ मार्चपूर्वी निविदा अंतिम करण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले होते. त्यानुसार औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने सुमारे ६३५ कोटींच्या निविदा अंतिम केल्या आहेत. या निविदा कंत्राटदारांनी कमी दराने भरल्या आहेत. त्यांना २४ एप्रिलपर्यंत अनामत रक्कम भरण्यासंदर्भात मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर कार्यारंभ आदेश देण्यात येतील. पुढील महिन्यात म्हणजे मेपासून या कामाला सुरुवात होईल असे पांडेय यांनी नमूद केले. कंत्राटदारांकडून अनामत रक्कम भरण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे. ज्या कंत्राटदाराने अनामत रक्कम भरली नाही, त्या कंत्राटदार एजन्सीला काळ्या यादीत टाकण्यात येईल. पण निविदा रद्द झाल्यास ती कामे पुन्हा घेता येणार नाहीत. नव्याने निविदा प्रक्रिया होणार नाही, असेही पांडेय म्हणाले.

Share