“…तर ते भांगेच्या नशेतील स्वप्न पाहतायत,” राऊतांच्या अटकेनंतर सामनातून हल्लाबोल

मुंबई : पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. पीएमपीएल कोर्टात हजर केल्यानंतर राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतरही शिवसेनेचे मुखपत्र सामनातून विरोधकांवर जोरदार टिका करण्यात आली आहे. शिवसेना कधीही झुकणार नाही. किती जणांना तुरूंगात ? महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील, असा निर्धार सामनातून केला आहे.

“शिवरायांचे हे राज्य बुडावे, त्याआधी ते नामर्द करावे असे कुणास वाटत असेल तर ते भांगेच्या नशेत आहेत, भांगेच्या नशेतील स्वप्न ते पाहत आहेत. महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील!”, असं म्हणत सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे. तसेच, “महाराष्ट्रावर तर एकापाठोपाठ घाव घालण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. महाराष्ट्र तोडायचा तर आधी शिवसेनेस संपवायलाच हवे. शिवसेना संपवायची तर फोडाफोडी, दहशत निर्माण करायची व त्याआधी संजय राऊत यांच्यासारखे लढाऊ व प्रखर बोलणारे, लिहिणारे, राज्यभर फिरणारे नेते खोट्या प्रकरणात गुंतवून तुरुंगात टाकायचे, हे असले उद्योग सुरू आहेत.”, असं म्हणत विरोधकांवरही टीकास्त्र डागण्यात आलं आहे.

“अर्थात महाराष्ट्र काय किंवा शिवसेना काय कधीही झुकणार नाही. किती जणांना तुरुंगात टाकाल? तुरुंग कमी पडतील अशी वेळ तुमच्यावर आल्याशिवाय राहणार नाही. सत्तेचा अमरपट्टा बांधून कोणीच जन्मास आलेले नाही. शिवरायांचे हे राज्य बुडावे, त्याआधी ते नामर्द करावे असे कुणास वाटत असेल तर ते भांगेच्या नशेत आहेत, भांगेच्या नशेतील स्वप्न ते पाहत आहेत. महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील!”, असं सामनात म्हटलं आहे.

“महाराष्ट्राचे आणि देशाचे एकंदरीत राजकारण खालच्या पातळीवर नेऊन ठेवले गेलेच होते. पण ते आता किती नीच पातळीवर पोहोचले आहे ते दिसू लागले आहे. शिवसेना नेते व ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना ‘ईडी’ने अटक करताच शिंदे गटातील आमदारांनी आनंद व्यक्त केला तर भाजपच्या लोकांनी जल्लोष केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी तर कमाल केली, ‘कर नाही त्याला डर कशाला” असे साळसूदपणे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. ‘ईडी’ला घाबरून पळ कोणी काढला व दिल्लीत जाऊन कसे कोण शरणागत झाले हे देशाने पाहिले आहे. संजय राऊत हे भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये जाऊन शुद्ध, स्वच्छ झाले असते तर त्यांच्यावर हे अटकेचे व छळाचे संकट ओढवले नसते. श्री. राऊत यांच्यावरील कारवाई आकसाने, राजकीय सूडापोटीच करण्यात आली आहे. त्यांना गोरेगावच्या पत्राचाळ प्रकरणाचे सूत्रधार ठरवण्यासाठी अनेक खोटे पुरावे उभे केले गेले. त्यांच्या घरावर धाड टाकली. मुळात कायदा व नियम या देशात राहिलाच नव्हता, पण आता राज्यघटना, लोकशाही वगैरे शब्दांचेही रोज हत्याकांड होत आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना राज्यसभेचे वरिष्ठ सदस्य असलेले राऊत यांना अटक झाली. संसदेचे अधिवेशन व उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होईपर्यंत सवलत मिळावी व त्यानंतर मी चौकशीसाठी हजर राहीन, असे पत्र त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता रविवारी पहाटे ‘ईडी’ची पथके राऊत यांच्या घरात घुसली व त्यांना ताब्यात घेतले ही तर तपास यंत्रणांची झुंडशाही व दिल्लीश्वरांच्या हुकूमशाहीचे शेवटचे टोक आहे. राज्यकर्त्यांनी असे ठरवले आहे की, सत्य व परखड बोलणाऱ्यांच्या जिभाच छाटायच्या किंवा नरडी आवळायची. हे असले दळभद्री प्रकार इंदिराजींनी आणलेल्या आणीबाणीतही घडले नव्हते. ज्या देशात राजकीय विरोधकांशी सन्मानाने वागले जात नाही त्या देशात लोकशाही व स्वातंत्र्याचे मोल संपते व नंतर देश संपतो. आज आपल्या देशात नेमके काय चालले आहे?” , असं सामनात म्हटलं आहे.

सामनातून म्हटलंय की, “संजय राऊत यांना बेकायदेशीरपणे अटक होताच गिरीश महाजन हे अत्यानंदाने भुईनळे उडवीत म्हणाले, “एकनाथ खडसे यांना कोर्टाने क्लीन चिट दिलेली नाही आणि तेदेखील त्यांच्या जावयांच्यासोबत जेलमध्ये जातील.” याचा काय अर्थ घ्यावा? आपण देशातील कायद्याचे, राज्यघटनेचे बाप झालात की कायद्यास आपण कोठीवर नाचवून त्यावर दौलतजादा करीत आहात? राजकीय विरोधक, मग त्या सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार असतील नाहीतर संजय राऊत, आमच्या विरुद्ध परखड बोलाल किंवा विरोधकांची एकजूट करण्याची हालचाल कराल तर याद राखा, असेच एकप्रकारे स्पष्टपणे बजावण्याचा हा प्रकार आहे. शिवसेनेचे अनिल परब यांच्या नसलेल्या व अद्यापही सुरू न झालेल्या रिसॉर्टमधून समुद्रात पाणी सोडले या भयंकर गुन्ह्याखाली परबांची कठोर चौकशी होते. १०-११ वर्षांपूर्वीच्या ५०-५५ लाखांच्या व्यवहाराचे प्रकरण बनावट पद्धतीने उभे करून संजय राऊत यांना तुरुंगात पाठवले जाते. २००४ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील वडिलोपार्जित घराबाबत शरद पवार यांना आयकर विभाग आता नोटिसा पाठवतो. त्याच वेळेला नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या, ललित मोदी यांच्यासारखे असंख्य आर्थिक गुन्हेगार परदेशात पळून जातात. मुळात ज्यांच्यावर ‘ईडी’ने कठोर कारवाई करावी असे असंख्य महात्मे आज सत्ताधारी पक्षात विराजमान आहेत. इतकेच कशाला, शिवसेनेतून शिंदे नामक गटात जे आमदार, खासदार सामील झाले व जे स्वतःची पोकळ छाती लपवून हिमतीचे बोल बोलत आहेत त्यातील अनेकांवर ‘ईडी’, आयकर खाते यांच्या कारवायांचा फक्त बडगाच उगारला गेला नव्हता तर त्यांच्या अटकेपर्यंत प्रकरण पोहोचले होते. आता हे सर्व लोक पुण्यात्मे झाले व ‘कर नाही त्याला डर कशाला’ अशा चिपळ्या वाजवत आहेत. मात्र या पळपुट्या नामर्द लोकांमुळे शिवरायांचा महाराष्ट्र बदनाम होत आहे.”

“महाराष्ट्रातील जनता ही शिवरायांचे नाव सांगते तेव्हा ती निधड्या छातीने, न लटपटता ‘ईडी’ असो की आणखी काही, बेडरपणे सामना करते. कर नाही त्याला डर कशाला म्हणायचे ते यालाच व हा बेडरपणा संजय राऊत यांनी दाखवला. संजय राऊत यांनी सहा महिन्यांपूर्वी एक खळबळजनक पत्र राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना लिहिले. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी मदत करा. अन्यथा परिणाम वाईट होतील. तुमच्यामागे चौकशांचा ससेमिरा लावला जाईल, असे सांगण्यासाठी दिल्लीतील काही प्रेमळ लोक राऊतांच्या घरी पोहोचले. राऊत यांनी नकार देताच त्यांनी ही कारवाईची आणि धमकीची तलवार ज्यांच्या मानेवर ठेवली त्यांनी आता ठाकऱ्यांचे सरकार पाडले आहे. ही क्रोनोलॉजी समस्त देशवासीयांनी समजून घेतली तर आपल्या देशात नक्की काय सुरू आहे याची कल्पना येईल. भाजपमध्ये गेल्याने शांत झोप लागते. ईडी, सीबीआयची भीती नाही, असे हर्षवर्धन पाटलांसारखे लोक सांगतात. तेच आजचे सत्य आहे. पण ही शांत झोप देशासाठी काळझोप ठरेल व संपूर्ण देश दहशतीच्या अंधारयुगात लोटला जाईल असे वातावरण आहे. महाराष्ट्रावर तर एकापाठोपाठ घाव घालण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. महाराष्ट्र तोडायचा तर आधी शिवसेनेस संपवायलाच हवे. शिवसेना संपवायची तर फोडाफोडी, दहशत निर्माण करायची व त्याआधी संजय राऊत यांच्यासारखे लढाऊ व प्रखर बोलणारे, लिहिणारे, राज्यभर फिरणारे नेते खोट्या प्रकरणात गुंतवून तुरुंगात टाकायचे, हे असले उद्योग सुरू आहेत. अर्थात महाराष्ट्र काय पिंवा शिवसेना काय कधीही झुकणार नाही. किती जणांना तुरुंगात टाकाल? तुरुंग कमी पडतील अशी वेळ तुमच्यावर आल्याशिवाय राहणार नाही. सत्तेचा अमरपट्टा बांधून कोणीच जन्मास आलेले नाही. शिवरायांचे हे राज्य बुडावे, त्याआधी ते नामर्द करावे असे कुणास वाटत असेल तर ते भांगेच्या नशेत आहेत, भांगेच्या नशेतील स्वप्न ते पाहत आहेत. महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील!”, असा हल्लाबोल सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.

Share