यंदाच्या आयपीलमध्ये क्रीडामंत्र्यावरही लागणार बोली !

मुंबई- आयपीएल २०२२ चा यंदाचा लिलाव १२ , १३  फेब्रुवारीला होणार आहे. यामध्ये किती खेळाडूंवर बोली लावली जाणार याची अंतिम यादी समोर आली आहे. या लिलावात एकूण ५९० खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये २२८ कॅप्ड खेळाडू, ३५५ अनकॅप्ड खेळाडू आणि ७ सहयोगी देशांतील खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यात पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री मनोज तिवारी याचेही नाव आहे. गेल्या तीन हंगामात मनोजवर बोली लावण्यात कोणत्याही संघाने स्वारस्य दाखवले नव्हते.

पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारमध्ये क्रीडा आणि युवा राज्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारणारा माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारीची लिलावासाठी मूळ किंमत ५० लाख रुपये आहे. तो शेवटचा आयपीएल २०१८ मध्ये खेळताना दिसला होता. त्यानंतर त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबने संघात सामील केले.

मनोजची लीगमध्ये कामगिरी चांगली झाली आहे. त्याने ९८ सामन्यात ७ अर्धशतकांच्या मदतीने १६९५ धावा केल्या आहेत. आयपीएल २०१७मध्ये त्याने ३२च्या सरासरीने ३२४ धावा केल्या. मनोजने भारताकडून १२ एकदिवसीय सामन्यांमध्ये २८७ धावा आणि ३ टी-२० सामन्यांमध्ये १५ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने १२५ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २७ शतकांच्या मदतीने ८९६५ धावा केल्या आहेत.

Share