खुलताबादेतील विकासकामे अधिक दर्जेदार करा- राज्यमंत्री आदिती तटकरे

औरंगाबाद : पर्यटन विकासाच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या खुलताबाद तालुक्यातील खिर्डी येथे नवीन ग्रामपंचायत इमारत, तसेच सुलीभंजन, वेरूळ, म्हैसमाळ आणि खुलताबाद शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन उद्योग, पर्यटन, खनिकर्म, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झाले. तसेच विकासकामे अधिक दर्जेदार व विहित कालमर्यादेत पूर्ण करावीत, अशा सूचना राज्यमंत्री तटकरे यांनी संबंधित यंत्रणेला केल्या.

राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या, विविध पर्यटन स्थळे असलेल्या खुलताबाद तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधा असाव्यात. या पर्यटन स्थळांच्या विकासातूनच पर्यटक, भाविक खुलताबादेत येतील. त्यामुळे येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

खिर्डीतील नवीन इमारत लवकरच नागरिकांच्या सेवेत येईल. याठिकाणच्या जुन्या इमारतीचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लेखा परीक्षण करून या इमारतीचा चांगल्याप्रकारे उपयोग करून घेण्यासाठी पुढाकार घेण्यात यावा. खिर्डी ते खुलताबाद चार कि.मी रस्त्याचेही काम आमदार चव्हाण यांच्या पुढाकारातून होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी खिर्डी ग्रामस्थांना दिला. खिर्डीत व्यायामशाळा उभारण्यासाठी क्रीडा विभागाने प्रस्ताव देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी क्रीडा विभागास दिल्या.

 खुलताबादेतील विकासकामांचे भूमिपूजन
वेरूळ येथील घृष्णेशवर, म्हैसमाळ येथील गिरीजा माता, खुलताबादेतील भद्रा मारोती मंदिरांची पाहणी करून येथील विविध विकासकामांचे भूमिपूजनही राज्यमंत्री तटकरे यांच्याहस्ते झाले. म्हैसमाळ येथील मंदिराच्या मागे असलेल्या येळगंगा नदीवर घाट बांधकाम करणे, भाविकांसाठी वाहन तळ, स्वयंपाक घराचे शेड बांधकाम, घृष्णेश्वर मंदिराच्या भक्त निवास परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे, खुलताबादेत विठ्ठल रूखमाई मंदिरासमोर सभा मंडप, रस्ते तयार करणे आदी कामांचा समावेश असून या कामांचेही भूमिपूजन राज्यमंत्री तटकरे यांनी केले.

Share