बेरोजगारीला कंटाळून उच्चशिक्षित तरूणाची आत्महत्या

औरंगाबाद : शहरातील आरेफ कॉलनी परिसरातील तरुणाने बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. मोहम्मद जियाउद्दीन चिस्ती असे या तरुणाचे नाव आहे. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे.

आरेफ कॉलनीतील मोहम्मद हे उच्चशिक्षित होते. त्याचे एमएससी, बीएडपर्यंत शिक्षण पूर्ण झाले होते. शिक्षक पदासाठी त्यांनी अर्जही केले, परंतू कुठे नोकरी मिळाली नाही. काही दिवसांपासून त्यांनी आरेफ कॉलनीत लहान मुलांच्या शिकवण्या सुरु केल्या होत्या. विशेष म्हणजे नोकरी मिळेपर्यंत लग्न करणार नाही असेही त्यांनी कुटूंबियांना सांगितले होते. दररोज ठराविक वेळेत उठणारे मोहम्मद खोलीबाहेर आलेच नाहीत. त्यामुळे त्यांची आई त्यांच्यासाठी जेवण वाढून गेल्या असता, आतून प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान मोठ्या भावाने खिडकीतून डोकावून बघितले असता मोहम्मद यांनी गळफास घेतल्याचे दिसले. पोलिसांच्या मदतीने मोहम्मद यांना घाटीत दाखल करण्यात आले असता, डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Share