गुजरात दंगलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली : २००२ साली झालेल्या गुजरात दंगलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘क्लीन चिट’ दिली आहे. या अगोदर एसआयटीनेही पंतप्रधान मोदी यांच्यासह ६४ जणांना ‘क्लीन चिट’ दिली होती. याविरोधात काँग्रेसचे माजी खासदार दिवंगत एहसान जाफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आज त्यांची याचिका फेटाळून लावत पंतप्रधान मोदी यांना ‘क्लीन चिट’ दिली आहे.

२८ फेब्रुवारी २००२ रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे दंगल झाली होती. गुलमर्ग सोसायटीमध्ये झालेल्या या दंगलीत काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्यासह ६९ जणांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते. तपासानंतर एसआयटीने नरेंद्र मोदी यांच्यासह ६४ जणांना ‘क्लीन चिट’ दिली होती. एसआयटीच्या या ‘क्लीन चिट’ अहवालाविरोधात काँग्रेसचे माजी खासदार दिवंगत एहसान जाफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर गेल्या वर्षी ९ डिसेंबर रोजी या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली होती. दोन्ही पक्षांचं म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आज झाकिया जाफरी यांच्या याचिकेवर निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी (२४ जून) एसआयटीच्या अहवालावर शिक्कामोर्तब केले आणि त्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेत योग्यता नसल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी, सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी घेण्यात आली. या प्रकरणात ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी झाकिया जाफरी यांची बाजू न्यायालयात मांडली.

Share