नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी विश्वेश्वर मंदिराशेजारी असलेल्या ज्ञानव्यापी मशिदीच्या सर्वेक्षणावरून वातावरण तापले असताना आता दिल्लीतील जामा मशिदीसंदर्भात हिंदू महासभेने एक दावा केला आहे. दिल्लीतील जामा मशिदीच्या पायऱ्यांखाली हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती पुरल्या आहेत, असा दावा हिंदू महासभेने केला आहे. इतकेच नव्हे तर, हिंदू महासभेने याबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून, जामा मशिदीचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे.
वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीतील विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाने केला आहे. हा वाद ताजा असतानाच आता हिंदू महासभेने दिल्लीतील जामा मशिदीच्या पायऱ्यांखाली हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती पुरल्या आहेत, असा दावा केला आहे. याबाबत हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी जामा मशिदीचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. तसेच जामा मशिदीच्या पायऱ्यांखाली हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती पुरल्या आहेत. त्यामुळे या जागेचे खोदकाम करून त्या मूर्ती बाहेर काढण्यात याव्यात, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
हिंदू महासभेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या या पत्रात इतिहासातील घटनांचा उल्लेख केला आहे. औरंगजेबच्या दरबारातील इतिहासकार शाही मुस्ताक यांनी १७१० मध्ये लिहिलेल्या पुस्तकात या घटनेचा उल्लेख केला होता. खानजहां बहादुरने जोधपूरमधील हिंदू मंदिरांमध्ये लूटमार केली. शेकडो वाहनांमध्ये ती संपत्ती भरून तो औरंगजेबसमोर आला. त्यावेळी औरंगजेबने त्याच्यावर खुश होऊन त्यातील मौल्यवान वस्तू आपल्या तिजोरीत ठेवण्याचे आदेश दिले. तसेच हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती दिल्लीतील जामा मशिदीच्या पायऱ्यांखाली पुरून टाकण्याचे आदेश दिले, असे या पत्रात म्हटले आहे. जामा मशिदीच्या पायऱ्यांखाली पुरलेल्या देवी-देवतांच्या मूर्ती बाहेर काढण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात जावे. जेणेकरून त्या मूर्तीची पूजा करू शकतो, अशी मागणी हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी या पत्रात केली आहे.