दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना अटक; हवाला प्रकरणात ‘ईडी’ ची कारवाई

नवी दिल्ली : नवी दिल्ली आप सरकारमधील आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी ‘ईडी’ अर्थात सक्तवसुली संचालनालयाकडून अटक करण्यात आली आहे. हवाला प्रकरणात सत्येंद्र जैन यांच्यावर ‘ईडी’ ने ही कारवाई केली आहे. कोलकाता येथील एका कंपनीसोबत हवाला व्यवहार व्यवहार केल्याचा सत्येंद्र जैन यांच्यावर आरोप आहे.

सत्येंद्र जैन हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री आहेत. ‘ईडी’ ने सत्येंद्र जैन यांना अटक केल्याने आम आदमी पक्ष काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘ईडी’ ने सत्येंद्र जैन यांची यापूर्वी चौकशी केली होती. सत्येंद्र जैन यांच्यावर ‘ईडी’ ने ५ एप्रिल रोजी कारवाई करत त्यांची ४.८१ कोटी रुपयांची संपत्ती तात्पुरती जप्त केली होती. मेसर्स अकिंचन डेव्हलपर्स, मेसर्स इंडो मेटल इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेडवर मनी लाँड्रिंग कायदा २००२ नुसार कारवाई करण्यात आली होती. ‘ईडी’च्या या कारवाईनंतर भाजपने आम आदमी पार्टीला लक्ष्य केले होते. तसेच दिल्लीमधील आपचे सरकार बरखास्त करण्याची मागणी घेऊन भाजपने दिल्लीमधील जंतर-मंतरवर आंदोलन केले होते. दुसरीकडे आप आदमी पक्षाने याआधी सत्येंद्र जैन निर्दोष असल्याचा दावा केला होता. “सत्येंद्र जैन हे एक प्रामाणिक व्यक्त आहेत. न्यायालय त्यांच्यावरचा खटला रद्द करेल,” असा दावा आपने केला होता.

सत्येंद्र जैन यांच्यावर २०१५-१६ दरम्यान मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप आहे. कोलकाता येथील बेनामी कंपन्यांमधील हवाला गुंतवणूक प्रकरणी त्यांच्यावर आज ‘ईडी’ ने कारवाई केली आहे. सत्येंद्र जैन यांच्यासह अरविंद केजरीवाल यांच्यावर भाजपच्या कपिल मिश्रा यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. सत्येंद्र जैन यांनी नवी दिल्लीच्या परिसरात जमीन खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी पैशांचा वापर केल्याचा ‘ईडी’ला संशय आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या मोहल्ला क्लिनिक योजनेच्या सल्लागारपदी सत्येंद्र जैन यांची मुलगी सैम्या जैन हिची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्या प्रकरणाची जोरदार चर्चा झाली होती. ते प्रकरण देखील सीबीआयपर्यंत पोहोचले होते.

अरविंद केजरीवालांचे निकटवर्तीय

नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय म्हणून सत्येंद्र जैन यांना ओळखले जाते. अरविंद केजरीवाल यांनी त्यांना आरोग्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. सत्येंद्र जैन यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनातदेखील महत्त्वाची भूमिका बजावली होती.
दरम्यान, गेल्याच आठवड्यात पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या (आप) सरकारचे आरोग्यमंत्री डॉ. विजय सिंगला यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांची तडकाफडकी मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली होती. आरोग्य विभागातील कामाची कंत्राटं देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून १ टक्का कमिशन मागितल्याचा डॉ. सिंगला यांच्यावर आरोप आहे. दरम्यान, डॉ. सिंगला यांना अटकही करण्यात आली आहे.

Share