चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे थैमान

शांघाय : चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे थैमान माजले आहे. चीनच्या शांघाय शहरात दररोज १५ ते २० हजार कोरोना रूग्ण आढळून येत आहेत. चीनमधील अनेक शहरात गेल्या कित्येक दिवसांपासून सक्तीचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे या देशातील लोकांचे दोन वेळच्या जेवणासाठी हाल होत असून, तब्बल २ कोटी ६० लाख लोकांची खाण्यापिण्यासाठी आबाळ सुरू आहे. लोकांना घराबाहेर पडणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे चिनी जनतेचा पुन्हा एकदा जगण्यासाठी संघर्ष सुरू झाला आहे.
आरोग्यविषयक सुविधांबाबत डंका वाजवणा-या चीनमध्ये पुन्हा एकदा आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. चीनमधील सर्वाधिक लोकसंख्येचं शहर अशी ओळख असलेल्या शांघायमधील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्यामुळे प्रशासनाने लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे तब्बल अडीच लाखाहून अधिक लोकांना घरामध्ये कैद व्हावे लागले आहे. इथली सगळी सुपरमार्केट्स बंद आहेत. त्यामुळे लोकांना दोन वेळच्या जेवणासाठी झगडावे लागत आहे. या लॉकडाऊनमुळे चीनच्या आरोग्य व्यवस्थेची लक्तरं वेशीला टांगली गेली आहेत. लोकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पुरवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याने प्रचंड रोष व्यक्त होत आहे.


शांघाय शहरात दररोज १५ ते २० हजार कोरोना रूग्ण आढळून येत आहेत. कोरानाच्या नव्या व्हेरियंटचा प्रसार इतरत्र होऊ नये यासाठी चीनमध्ये झिरो कोव्हिड पॉलिसी राबवण्यात येत आहे. तसेच जोपर्यंत शहरातील सर्व लोकांच्या सँपल्सची तपासणी होत नाही तोपर्यंत निर्बंध कायम राहतील, अशी घोषणा प्रशासनाने केली आहे. शांघायसह चीनच्या पाच शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे लोकांचे हाल होत आहेत. याआधीही सक्तीच्या लॉकडाऊनविरोधात चिनी लोकांनी निदर्शने करत निषेध व्यक्त केला होता. आता भूकेने लोकांचा जीव कासावीस झाला आहे. त्यामुळे कोरोनाला रोखायचे की, निर्बंध शिथील करायचे अशा दुहेरी संकटात चीनचे प्रशासन सापडले आहे.

Share