“…तिथेच या हरा**** राजकीय चिता पेटेल अन् हीच बाळासाहेबांना खरी आदरांजली”

मुंबई  : शिवसेनाप्रमुखांच्या आजच्या जन्मदिनी एक निर्धार प्रत्येकाने केलाच पाहिजे, तो म्हणजे शिवसेनाप्रमुखांच्या नावे सुरू झालेला ढोंगाचा बाजार कायमचा गाडण्याचा व संपवण्याचा. बाळासाहेबांच्या जन्मदिनी गंगेच्या प्रवाहातील ओंडके आपोआप दूर झाले व काशीच्या हरिश्चंद्र घाटावर पोहोचले.  त्याच घाटावर या हरा*** राजकीय चिता पेटेल हीच बाळासाहेबांना त्यांच्या जन्मदिनी विनम्र आदरांजली’ अशा शब्दांत ठाकरे गटाचे मुखपत्र असेल्या ‘सामना’तून शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली आहे.

सध्या महाराष्ट्रात एक भलतेच राजकारण सुरू झाले आहे. त्यात शिवसेनाप्रमुखांची चोरी करण्याचा विषय प्रामुख्याने आहे, पण या चोरीमारीस देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री वगैरे लोकांनी हातभार लावावा याचे आश्चर्य वाटते. महाराष्ट्राला ढोंग मान्य नाही. शिवसेनाप्रमुख तर नेहमीच ढोंगबाजांच्या कंबरड्यात लाथा घालीत राहिले. ढोंगबाजांचे मुखवटे त्यांनी जाहीरपणे फाडले, पण गेल्या पाचेक महिन्यांत महाराष्ट्रात ढोंगबाजीने कहर केला आहे. शिवसेनेचे मुखवटे लावून काही मंबाजी सत्तेत घुसले व त्यांनी मंदिरातून देव चोरावेत तसे शिवसेनाप्रमुख चोरण्याचा प्रयत्न केला. पुन्हा या चोरीत कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी चोरांना पाठबळ व कवच देण्याचे काम देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री करताना दिसत आहेत’ असा आरोपही ठाकरे गटाने शिंदे गटावर केला आहे.

मोदी यांच्या कार्यक्रमात व्यासपीठावर फक्त भाजपचाच बोलबाला होता. स्वतःस शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणवून घेणाऱ्यांना मोदींच्या समोरच भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची खरी जागा कशी दाखवली याचे चित्रीकरण समोर आले. भाजपने एक पेंढा भरलेला कोल्हा खुर्चीवर बसवला आहे व त्या कोल्हय़ास काडीमात्र किंमत नाही. शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्याने व्यासपीठावर जो अपमान सहन केला, अशांना बाळासाहेबांचे कटआऊट वगैरे लावून ढोंगबाजीचे प्रदर्शन करण्याची गरज नाही. असंही शिवसेनेने म्हटलं आहे.

Share