…त्यांनी मंदिरातून देव चोरावेत तसे शिवसेनाप्रमुख चोरण्याचा प्रयत्न केला

मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी ठाकरे गटाचे मुखपत्र असेल्या ‘सामना’तून शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली आहे. शिवसेना नावाचे अग्निकुंड आजही धगधगताना दिसत आहे. आत्मविश्वासाचे बळ असेल तर जगात तुमचा पराभव कोणीच करू शकणार नाही, हा शिवसेनाप्रमुखांचा मंत्र प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात मशालीसारखा पेटता आहे. ही मशाल गेल्या पंचावन्न वर्षांत कुणालाच विझवता आली नाही. सध्या महाराष्ट्रात एक भलतेच राजकारण सुरू झाले आहे, असे सामनाच्या संपादकीय मधून शिंदे गटावर जहरी टीका करण्यात आली आहे.

शिवसेनाप्रमुखांची चोरी करण्याचा विषय प्रामुख्याने आहे, पण या चोरीमारीस देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री वगैरे लोकांनी हातभार लावावा याचे आश्चर्य वाटते. महाराष्ट्राला ढोंग मान्य नाही. शिवसेनाप्रमुख तर नेहमीच ढोंगबाजांच्या कंबरडय़ात लाथा घालीत राहिले. ढोंगबाजांचे मुखवटे त्यांनी जाहीरपणे फाडले, पण गेल्या पाचेक महिन्यांत महाराष्ट्रात ढोंगबाजीने कहर केला आहे. शिवसेनेचे मुखवटे लावून काही मंबाजी सत्तेत घुसले व त्यांनी मंदिरातून देव चोरावेत तसे शिवसेनाप्रमुख चोरण्याचा प्रयत्न केला. पुन्हा या चोरीत कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी चोरांना पाठबळ व कवच देण्याचे काम देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री करताना दिसत आहेत, असा आरोपही सामनाच्या संपादकीय मधून करण्यात आला आहे.

हे ढोंग नाही तर काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागील आठवड्यात मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी विविध विकासकामाचं उद्घाटन आणि लोकार्पण केले. यावरुनही ठाकरे गटानं मोदींवर निशाणा साधला आहे. सामनात म्हटलं आहे की, पंतप्रधान मोदी हे चार दिवसांपूर्वी सर्व लवाजमा घेऊन मुंबईस आले. त्यांनी अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. त्यांनी मुंबईच्या विकासासाठी काही घोषणा केल्या. ज्या मोदी सरकारने दोन महिन्यांपूर्वीच महाराष्ट्रातून सवादोन लाख कोटींचे उद्योग बाजूच्या गुजरात राज्यात पळवले, त्यांनी मुंबईत येऊन विकासावर भाष्य करावे हे ढोंग नाही तर काय? असा सवालही उपस्थित केला आहे

Share