आजारी असूनही आमदार मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप विधान परिषदेच्या मतदानासाठी सज्ज

पुणे : विधान परिषद निवडणुकीचे मतदान काही तासांवर येऊन ठेपले असताना सर्व पक्षांकडून एकेका मतासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, मोठ्या आजाराने ग्रस्त असलेल्या भाजपच्या पुण्याच्या आमदार मुक्ता टिळक आणि भाजपचेच चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हे दोघेही उद्या विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी विधान भवनात हजर राहणार आहेत.

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि पुण्याच्या माजी महापौर आणि सध्याच्या आमदार मुक्ता टिळक हे दोघे आजारी असतानादेखील रुग्णवाहिकेद्वारे मतदान करण्यासाठी हजर राहिले होते. आता हे दोन्ही आमदार विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी उद्या मुंबईला जाणार आहेत. डॉक्टरच्या सल्ल्याने या दोन्ही आमदारांनी योग्य ती काळजी घेऊन आजारपणातही मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

विधान परिषदेच्या १० जागांसाठी उद्या सोमवारी मतदान होणार असून, भाजपचे ५ आणि महाविकास आघाडीचे ६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गुप्त मतदान असल्यामुळे आमदारांची फोडाफोडी होण्याची भीती आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले असून, आमदार फुटू नयेत यासाठी खबरदारी घेतली जात आहे. विधान परिषदेसाठी भाजपचे पाच उमेदवार रिंगणात असून, त्यांना तब्बल २२ मतांची गरज आहे. या सर्व मतांची जुळवाजुळव पक्षाकडून चालू आहे. अपक्ष आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजप प्रयत्न करत आहे.

सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी होण्यासाठी एकेका मतासाठी पळापळ सुरू असताना भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हे मतदानासाठी हजर राहणार आहेत. राज्यसभेच्या मतदानासाठी ते व्हील चेअरवरून हजर राहिले होते. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर हा विजय आमचा नसून आमचे लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप यांचा असल्याचे म्हटले होते. त्यानंतर प्रकृतीमुळे विधान परिषदेसाठी ते मतदान करणार काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांना “तुम्ही तुमची प्रकृती सांभाळा, मत महत्त्वाचे नाही, प्रकृती महत्त्वाची आहे, असे म्हटले होते. मात्र, आ. लक्ष्मण जगताप यांनी “मी मतदानासाठी येणारच”, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे ते उद्या मुंबईत मतदानासाठी हजर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आमदार मुक्ता टिळक या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतानादेखील राज्यसभा निवडणुकीसाठी रुग्णवाहिकेतून विधानभवनात मतदानासाठी गेल्या होत्या. त्यांनी पीपीई कीट, मास्क घालून स्ट्रेचरवरून जात मतदान केले होते. आ. टिळक यांची धडाडी पाहून पक्षाच्या नेत्यांनी दाद दिली होती. आता आ. मुक्ता टिळक पक्षादेश पाळत विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी जाणार आहेत.

Share