मालवणजवळ तारकर्लीच्या समुद्रात बोट उलटली; दोन पर्यटकांचा मृत्यू

सिंधुदुर्ग : कोकणात मालवणमधील तारकर्ली येथील समुद्रात पर्यटकांना स्कुबा डायव्हिंगसाठी घेऊन गेलेली बोट उलटली. या दुर्घटनेत दोन पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या बोटीमध्ये एकूण २० पर्यटक होते. त्यापैकी १६ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असून, दोघांवर उपचार सुरू आहेत.

आज मंगळवारी (२४ मे) सकाळी तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्यावरून जय गजानन ही बोट २० जणांना घेऊन स्कुबा डायव्हिंगसाठी समुद्रात गेली होती. त्यानंतर स्कुबा डायव्हिंगही व्यवस्थित पार पडले. मात्र, तेथून परत येताना घात झाला. ही बोट समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर असतानाच दुपारी एमटीडीसी रिसॉर्टजवळ अचानक उलटली. बोट उलटल्यानंतर पर्यटकांना वाचवण्यासाठी मदतकार्य सुरू झाले. या सर्वांना समुद्रातून बाहेर काढेपर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला. आकाश देशमुख (रा. अकोला) आणि स्वप्नील पिसे (रा.पुणे) अशी मयतांची नावे आहेत, तर दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही बोट समुद्रात उलटली तेव्हा त्यामध्ये २० जण होते. बोटीतील सर्व पर्यटक हे पुणे आणि मुंबईतील असल्याचे समजते. मात्र, बोट समुद्रात अचानक का उलटली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

स्कुबा डायव्हिंगवरून समुद्रकिनाऱ्याकडे परतणारी ही बोट बुडू लागली असताना किनाऱ्यावरील स्थानिकांबरोबरच तेथे उपस्थित असणाऱ्या सुरक्षा यंत्रणांमधील कर्मचारी तातडीने बोट बुडत असणाऱ्या ठिकाणी बोटींच्या मदतीने पोहोचले. बोटीवरील २० पर्यटकांपैकी १६ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. मात्र, दोन जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. मृतांच्या नाका, तोंडामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याने गुदमरुन त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. अन्य दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या बोटीतील इतर सर्व पर्यटकांना तात्काळ मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सद्यःस्थितीत बोटीतील सर्व पर्यटक सापडले आहेत, अशी माहिती पोलिस पाटील देवबाग यांनी दिली.

या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. स्थानिक प्रशासनाकडून या दुर्घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. बोट चालक आणि मालकावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बोटीची प्रवाशी क्षमता किती होती, दुर्घटना घडली तेव्हा पर्यटकांना लाईफ जॅकेटस देण्यात आली होती का, याचा सध्या तपास केला जात आहे. मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील पर्यटकांमध्ये स्कुबा डायव्हिंगसाठी तारकर्ली हे हॉट फेव्हरेट डिस्टीनेशन ठरत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक तारकर्लीला येतात. मात्र, आता पर्यटनाच्या कालावधीत हा अपघात झाल्याने पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Share