चालकाला झोप लागली अन् घात झाला; यमुना एक्सप्रेस वेवर भीषण अपघातात ५ जागीच ठार

आग्रा : चारधाम यात्रेसाठी निघालेल्या यात्रेकरूंच्या बोलेरो जीपला उत्तर प्रदेशातील यमुना एक्स्प्रेस वेवर नोएडानजीक गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात चार महिलांसह एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. बोलेरो जीपने डंपरला पाठीमागून धडक दिल्याने घडलेल्या या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती येथील एका दाम्पत्यासह अन्य दोघांचा समावेश असून, एक जण कर्नाटकातील रहिवासी आहे. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येते.

चंद्रकांत नारायण बुराडे (वय ६८ वर्षे), सुवर्णा चंद्रकांत बुराडे (वय ५९ वर्षे), मालन विश्वनाथ कुंभार (वय ६८ वर्षे), रंजना भरत पवार (वय ६० वर्षे) (सर्व रा. बारामती, पुणे) आणि नुवंजन मुजावर (वय ५३ वर्षे, रा. बेळगाव, चिकोडी, कर्नाटक) हे पाच जण या भीषण अपघातात जागीच ठार झाले, तर नारायण रामचंद्र कोळेकर (वय ४० वर्षे, रा. फलटण, जि. सातारा) व सुनीता राजू गस्ते (वय ३५ वर्षे, रा. बेळगाव, कर्नाटक) हे दोघे गंभीर जखमी झाले.

चारधाम यात्रेसाठी महाराष्ट्रातून एकूण पन्नास भाविक निघाले होते. बुधवारी (११ मे) रात्री वृंदावन या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला. त्यापैकी बारामती येथील चंद्रकांत नारायण बुराडे यांच्यासह सात जण गुरुवारी (१२ मे) पहाटे साडेचार वाजता बोलेरो गाडीतून दिल्लीकडे जाण्यासाठी निघाले होते. दिल्लीच्या अलीकडे नोएडानजीक जेवर या गावाजवळ डंपरला भाविकांच्या बोलेरो गाडीने मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बोलेरो गाडीतून परवा करणाऱ्या बारामतीतील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. अन्य एक जण या अपघातात ठार झाला. बोलेरो गाडीचा चालक नारायण कोळेकर हा गंभीर जखमी झाला असून, त्याला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. नोएडामधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याव्यतिरिक्त निपाणी येथील मुजावर कुटुंबातील दोन महिलादेखील या अपघातात जखमी झाल्या आहेत.

या अपघातानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ योग्य ते उपचार देण्यासंदर्भात संबंधितांना सूचना दिल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी आपघातग्रस्तांना मदत करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहेत. स्वतः अजित पवार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्यासह त्यांचे विशेष कार्य अधिकारी हनुमंत पाटील हे दिल्लीतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आहेत.

Share