अकोला : पोटच्या तीन मुलांना विष पाजून नंतर त्यांची निर्घृण हत्या केल्याच्या आरोपातून न्यायालयाने वडिलांची निर्दोष सुटका केली. मात्र, कारागृहातून सुटताच त्याच वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू परिसरात ही खळबळजनक घटना घडली.
१० मे २०१८ रोजी अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलिस स्टेशन हद्दीतील धोतर्डी या गावात तिहेरी हत्याकांड घडले होते. धोतर्डी येथील रहिवासी विष्णू दशरथ इंगळे यांच्या पत्नीचे निधन झाल्याने नैराश्यातून त्यांनी त्यांची तीन मुले १७ वर्षीय अजय इंगळे, १५ वर्षीय मनोज इंगळे आणि १२ वर्षाची मुलगी शिवानी इंगळे यांना विष पाजून त्यांची वरवंट्याने डोके ठेचून निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी विष्णू इंगळे याच्याविरुद्ध भांदवि कलम ३०२, ३०९ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.
सदर गुन्ह्याचा तपास केल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.बी. पतंगे यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे १६ साक्षीदार तपासण्यात आले, तर आरोपी विष्णू इंगळेचे वकील देवानंद गवई यांनी उलटतपासणीत साक्षीदारांचे म्हणणे खोडून काढले. आरोपी विष्णू इंगळेला पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अटक केली हे सिद्ध करून सांगितले. सरकार पक्षाच्या आणि बचाव पक्षाचे वकिलांच्या युक्तिवादानंतर सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने आरोपी विष्णू इंगळेची २९ जून रोजी निर्दोष सुटका केली. मात्र, कारागृहातून बाहेर येताच विष्णू इंगळे यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.
विष्णू इंगळे यांनी काल (३० जून) बोरगाव मंजू परिसरातील झाडाला दोर बांधून गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.