अकबरुद्दीन ओवैसींनी घेतले औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन, राजकीय वादाला सुरुवात

औरंगाबाद : एमआयएमचे तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. अकबरूद्दीन ओवैसी हे औरंगाबादमधील एका महिला शाळेचे उद्घाटन करण्यासाठी आले आहे. त्यांनी आज खुलताबाद येथील मुघल सम्राट औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत औरंगाबादचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील, वारीस पठाण तसेच मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. या क़ृतीमुळे आता अकबरुद्दीन ओवैसींवर टीका होत आहे.

दरम्यान याप्रकरणी औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की, “औरंगजेबाने प्रजेला खूप त्रास दिला आहे. त्याने हिंदू धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. खुल्ताबादच्या औरंगजेबाच्या कबरीवर कुणी जात नाही. पण हे लोकं राजकारण करण्यासाठी तिथे गेले आहेत.” असा आरोप खैरे यांनी केला आहे. एमआयएमची कृती औरंगजेबासारखी आहे. येथे पाय रोवून हिंदु आणि इतर समाजाला त्रास देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. इम्तियाज जलील आधी दावा करीत होते की, औरंगजेबाच्या कबरीवर दर्शनासाठी गेल्याचे पुरावे दाखवा आता थेट व्हिडिओ आणि फोटोच समोर आले आहे. आता गुढघे, मस्तक टेकवले हे आम्ही पहिल्यापासूनच बोलत होतो. हैद्राबादी माणसं रझाकारीची जाणीव करुन देण्यासाठी येथे येत आहेत. जिल्ह्याचे राजकारण आणि वातावरण खराब करण्यासाठी ते येत असल्याचेही खैरे म्हणाले.

खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, “आज ते एका चांगल्या उपक्रमासाठी आलेले आहेत. आम्ही जे काम केलेले आहेत अशा घोषणा दुसऱ्या पक्षानेसुद्धा कराव्यात.” असं जलील बोलताना म्हणाले. “खुल्ताबादमध्ये खूप मोठेमोठे दर्गे आहेत. त्यांना मोठा इतिहास लाभलेला आहे. तिथे कुणीही गेलं तर त्या कबरीचं दर्शन घेतं त्यामुळे त्यामध्ये वेगळा अर्थ काढू नये.” असं जलील बोलताना म्हणाले. आता सगळे रंग आमचे झाले आहेत असंही ते म्हणाले आहेत.

 

 

 

Share