नागपूर : ‘तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या ‘मर्सिडिज बेबींनी’ ना संघर्ष केला आहे, ना संघर्ष पाहिला आहे. त्यामुळे कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा ते उडवू शकतात,’ असा पलटवार करीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
बाबरी मशीद पाडली जात असताना मी तिथे उपस्थित होतो;पण शिवसेनेचा कोणताही नेता तेथे उपस्थित नव्हता, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १ मे रोजी मुंबईत झालेल्या भाजपच्या ‘बूस्टर सभेत’ केला होता. त्यावर युवासेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी “देवेंद्र फडणवीस हे १८५७ च्या उठावातही सहभागी होते”, असे म्हटले होते. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या या टीकेचा देवेंद्र फडणवीस यांनी आज खरपूस शब्दात समाचार घेतला. आदित्य ठाकरेंना ‘मर्सिडिज बेबी’ या नव्या नावाने संबोधत फडणवीस म्हणाले, ‘आमच्यासारखे लाखो कारसेवक जे बाबरी पाडली गेली तेव्हा तिथे उपस्थित होते त्यांना आजही गर्व आहे. मी हिंदू आहे आणि त्यामुळे माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. त्यामुळे मागील जन्मामध्ये मी असेल तर १८५७ च्या युद्धामध्ये मी तात्या टोपे आणि झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या बाजूने लढत असेल आणि तुम्ही असाल तर त्याही वेळी तुम्ही इंग्रजांसोबत युती केली असेल. कारण आता तुम्ही अशा लोकांसोबत युती केली आहे जे १८५७ च्या युद्धावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते तर शिपायांचं बंड होतं, असं म्हणतात,’ अशा शब्दांत फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
मनसेच्या आंदोलनावर काय म्हणाले फडणवीस?
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना आज राज्यभरात मशिदीच्या भोंग्यांबाबत सुरू असलेल्या असलेल्या मनसेच्या आंदोलनावरही प्रतिक्रिया दिली आहे. ‘फक्त हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिला म्हणून राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणारे सरकार मशिदीच्या भोंग्यांवरून आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेणारच. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र, सरकार जर आपली जबाबदारी पार पाडत नसेल तर राजकीय पक्षांना आपापली भूमिका मांडावीच लागेल आणि ती मांडली जात आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे आणि अमृता फडणवीस यांच्यात एक साम्य
मुख्यमंत्र्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर त्यावर प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझी पत्नी अमृता यांच्यात एक साम्य आहे . उद्धव ठाकरे टोमणे मारणे सोडत नाहीत आणि माझी बायको नको त्या गोष्टीला उत्तर देणे सोडत नाही. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून आपली पातळी वर ठेवली पाहिजे आणि अशा काही गोष्टी आल्या तर माझ्या पत्नीनेही त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे”, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.