भाजपने राजकारणासाठी राज ठाकरेंचा बळी दिला

मुंबई : राज्यात भोंग्यांविरोधात सुरू असलेले आंदोलन हे भाजपच्या इशाऱ्यावर सुरू असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला. मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने महाराष्ट्रात हिंदुत्त्वाचा गळा घोटला. मशिदीवरील भोंगे, कोणतेही लाऊडस्पीकर असो, २००५ चा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. मनसेसारख्या पक्षाला पुढे आणून हा विषय चर्चेत आणला, गोंधळ घातला गेला, असेही खा. राऊत म्हणाले.

खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना हिंदुत्वासाठी आणि श्रद्धाळूंसाठी आजचा दिवस हा काळा दिवस आहे, असे म्हणत भाजप आणि मनसेवर टीका केली. मशिदीवरील भोंगे, कोणतेही लाऊडस्पीकर असो, २००५ चा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. मनसेसारख्या पक्षाला पुढे करून हा विषय चर्चेत आणून गोंधळ घातला गेला, असा आरोप संजय राऊत यांनी केला. शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरसह अनेक ठिकाणी काकड आरती होते. काकड आरतीचा आनंद घेण्यासाठी हजारो लोक उभे असतात. भोंग्यांचा विषय निर्माण झाल्याने आज मंदिरांवरील भोंग्यावर काकड आरती लागली नाही. शिर्डी आणि त्र्यंबकेश्वर येथे लोकांना काकड आरतीचा लाभ घेता आला नाही. लाखो हिंदू भाविकांची गैरसोय झाली. आजचा दिवस हिंदुत्त्वासाठी काळा दिवस आहे. भाजप आणि त्यांच्या उपवस्त्राने हिंदुत्त्वाचा गळा घोटला आहे. मुख्यमंत्र्यांकडे हजारो लोकांनी मेल करुन आमच्यावर हा अन्याय का, असे विचारले आहे, असे राऊत म्हणाले.

भोंग्यांसाठी जे आंदोलन करत आहेत त्यांच्या विरोधात असंतोष निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेशात भोंग्यांच्या नियमांचे पालन झाले आहे. मात्र, सर्वाधिक त्रास हिंदूंना झाला आहे, असे सांगून ते म्हणाले, भोंग्यावरील निर्णय एक व्यक्ती घेऊ शकत नाही. हा वाद धार्मिक आहे, हिंदू धर्मीयांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. राज ठाकरे यांचा राजकीय बळी देण्यात आला आहे. भाजपला जी गोष्ट जमत नाही ती छोट्या पक्षांकडून करून घेतात. राज ठाकरेंचा वापर भाजपकडून करून घेतला आहे, असा आरोप खा. संजय राऊत यांनी यावेळी केला.

Share