हल्ल्याचा कट उधळला, मोदींच्या दौऱ्याआधी जम्मूत दोन अतिरेक्यांचा खात्मा

जम्मू-काश्मिर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्याआधी सुरक्षा दलांनी दोन अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. सुंजवामध्ये लष्कराच्या छावणीजवळ आत्मघाती हल्ला करण्यासाठी आलेल्या अतिरेक्यांना सुरक्षा दलांनी चकमकीत ठार केले. या चकमकीत सीआयएसएफचे एएसआय शंकरप्रसाद पटेल शहीद झाले आणि ९ जवान जखमी झाले आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिरेक्यांविरोधातील मोहीम शुक्रवारी पहाटे ४.२५ वाजता सुरू झाली. ड्यूटी बदल होत असताना सुरक्षा रक्षकांनी दोन संशयित लष्करी छावणीत घुसताना पाहिले. यादरम्यान १५ सुरक्षा रक्षकांना घेऊन सीआयएसएफची बस जम्मू विमानतळाकडे निघाली. यादरम्यान अतिरेक्यांनी बसवर ग्रेनेड फेकले आणि गोळीबार करत आसपासच्या घरात घुसले. यानंतर सुरक्षा दलांनी नाकेबंदी करून गोळीबार केला. त्यात दोन अतिरेकी मारले गेले. प्राथमिक चौकशीनुसार दोन अतिरेकी गुरुवारी आरएसपुरा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवरून जम्मू शहराच्या बाह्य भागात घुसले.

दोन अतिरेकी पाकिस्तानच्या जैश-ए-मोहंमदच्या आत्मघाती पथकातील सदस्य होते. काश्मीरमध्ये त्यांची घुसखोरी पंतप्रधानांच्या दौऱ्यात अडथळा आणण्याचा कट असू शकतो. दोघांनी आत्मघाती जॅकेट घातले होते आणि मोठ्या प्रमाणात शस्त्र तसेच दारूगोळा आणला होता. अतिरेक्यांकडून दोन एके-४७, ए अंडर बॅरल ग्रेनेड लाँचर आणि एक सॅटेलाइट फोन मिळाला. जखमी जवानांना जम्मूच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Share