ट्रक-क्रूझर जीपच्या भीषण अपघातात ८ जागीच ठार

बीड : भरधाव ट्रक आणि क्रूझर जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात आठ प्रवासी जागीच ठार झाले आहेत. अंबाजोगाई-लातूर महामार्गावरील सायगावच्या खडी केंद्राजवळ शनिवारी (२३ एप्रिल) सकाळी हा भीषण अपघात घडला. मृतांमध्ये सात महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

या अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व जण लातूर जिल्ह्यातील आर्वी येथील रहिवासी आहेत. हे सर्व जण आज शनिवारी (२३ एप्रिल) सकाळी क्रूझर जीप (क्र.एम. एच. २४/व्ही. ८०६१ ) मधून अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे उत्तमराव गंगणे यांच्याकडे एका घरगुती कार्यक्रमासाठी जात होते. शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास अंबाजोगाई-लातूर महामार्गावरील सायगाव येथील खडी केंद्राजवळ नंदगोपाल दूध डेअरीसमोर समोरून भरधाव आलेल्या ट्रक (क्र. आर. जे. ११/जी. ए. ९२१०) ने या क्रूझर जीपला जोरात धडक दिली. यामध्ये क्रूझर जीपमधील सात महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर क्रूझर जीपचालकाचा रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेत मृत्यू झाला.

हा अपघात इतका भीषण होता की, जीपमधील महिला घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. महिला आणि बालकाचे धड अक्षरशः वेगळे तुटून पडले होते. या अपघातात काही जण जखमी झाले असून, जखमींना अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातातील मयतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

Share