ऋतुजा लटके यांच्या विजयाचे खरे शिल्पकार देवेंद्र फडणवीस – खासदार अनिल बोंडे

अमरावती : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाेहब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. ऋतुजा लटके यांना ६६ हजार २४७ मतं मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावर ‘नोटा’ ला १२ हजार ७७६ मतं मिळाली. लटके यांच्या विजयानंतर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून भाजपने माघार घेतल्यानेच लटके यांचा विजय झाला असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. भाजप नेते आणि खासदार अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

भाजप नेते आणि खासदार अनिल बोंडे म्हणाले की, ऋतुजा लटके यांचं खरं तर पहिले अभिनंदन करतो. मात्र त्यांच्या या विजयाचे श्रेय हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना द्यायला हवं. कारण आज जे शिवसैनिक नाचतं आहेत, पेढे वाटत आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे! कारण त्यांनी भाजपचा उमेदवारी अर्ज मागे घेतला, म्हणून ऋतुजा लटके यांचा विजय झाला. जर भाजपचा उमेदवारी अर्ज कायम असता तर आज जे शिवसैनिक नाचत आहेत त्यांचे चेहरे लटकलेले राहले असते, असंही अनिल बोंडे म्हणाले.

दरम्यान, विजयानंतर ऋतुजा लटके यांनी प्रतिक्रिया दिली असून त्या म्हणाल्या की, आज झालेला विजय माझा नसून माझे पती रमेश लटके यांचा आहे,असे मी मानते. रमेश लटके यांनी हयात असताना जी जनसेवा केली, लोकांची कामे केली त्याचचं रूपांतर आजच्या विजयात झाल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

Share