वैष्णवांच्या मांदियाळीत अकलूजमध्ये रंगले तुकोबारायांच्या पालखीचे तिसरे रिंगण

अकलूज (सोलापूर) : आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेली जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी मंगळवारी अकलूजमध्ये दाखल झाली. अकलूज नगरीत पालखी दाखल होताच, पालखीचे तिसरे रिंगण मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी विविध खेळात दंग झालेल्या वैष्णवांमुळे रिंगणात रंग भरला होता. जवळपास दोन वर्षानंतर हा रिंगण सोहळा पार पडल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

वारकरी आणि अकलूजकर रिंगण सोहळ्याचा थरार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने मैदानावर जमले होते. तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे सराटी येथील निरा नदीत स्नान झाल्यानंतर पालखी अकलूज नगरीत पोहचली. तुकाराम महाराजांच्या पालखीने अकलूजमध्ये प्रवेश केल्यानंतर वाजतगाजत या पालखीचे स्वागत करण्यात आले. अकलूजच्या सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानात रिंगण सोहळा पार पडला.

तत्पूर्वी, इंदापूर तालुक्यातील सराटी येथे ग्रामस्थांच्या वतीने अभिषेक करण्यात आला. पंचपदीचे अभंग झाले. त्यानंतर वंशजांनी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना सूर्योदयाच्या वेळी नीरा नदीमध्ये स्नान घातले. नदीच्या तीरावरील भाविकांनी ‘बोला पुंडलिक वरदे…’चा जयघोष केला. पुणे जिल्ह्याच्या वतीने अतिरिक्त मुख्य कार्यकारी भारत शेंडगे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार श्रीकांत पाटील, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, अप्पासाहेब जगदाळे यांच्यासह भाविकांनी या सोहळ्याला निरोप दिला. त्यानंतर पालखी सोहळ्याने काल सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांनी सोहळ्याचे स्वागत केले.

अकलूज नगरीत पालखी दाखल होताच पालखीचे तिसरे रिंगण मोठ्या उत्साहात पार पडले. रिंगणाचे पूजन मान असलेल्या मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले. माने विद्यालयाच्या मैदानावर सव्वा दहा वाजता नगारखाना व अश्व आले. रथापुढील दिंड्या आत आल्या. साडेदहा वाजता अब्दागिरी, गरुडटक्के व संभाजी महाराज छत्रपती यांनी दिलेला जरीपटका ध्वज, रिंगणात पोचला. अकराच्या सुमारास पालखी रिंगणात पोचली. त्यामागील दिंड्या सोहळ्यात आल्या. मोहिते-पाटील यांच्या अश्वांचे पूजन धवलसिंह मोहिते-पाटील यांनी केले.

सकाळी अकरा वाजल्यानंतर पताकाधारी वारकऱ्यांनी दोन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्यानंतर दहा मिनिटांनी तुळस हांडेकरी महिलांनीदेखील एक प्रदक्षिणा केली. साडेअकरा वाजता पखवाज वादक टाळकरी एक प्रदक्षिणा पूर्ण केली. साडेअकरा वाजता देवाच्या बाभूळगावकरांच्या अश्वांचे पूजन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व पत्नी उर्वशीराजे व जयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाले.

पावणे बारा वाजता अश्वांचे रिंगण सुरू झाले. अश्वांनी डौलदार दौड करीत चार फेऱ्या पूर्ण करीत डोळ्यांचे पारणे फेडले. ‘भाग्याचा उदय । ते हे जोडी संतपाय ॥’ हा मानाचा अभंग बारा वाजता झाला. त्यानंतर आरती झाली. त्यानंतर पालखी उचलून दर्शन मांडवात ठेवली. ‘हे माझी मिराशी । ठाव तुझ्या पायांपाशीं ॥’ हा विसाव्याचा अभंग झाला. नंतर समाज आरती झाली.
माने विद्यालयाच्या रिंगणात रंगलेला सोहळा दुपारी साडेबारा वाजता मुक्कामी विसावला. अखंड प्रेमभक्तीत अकलूजकरांच्या पाहुणचारात वैष्णव सुखावले. बुधवारी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण माळीनगर येथे होणार आहे.

Share