ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्याला उत्साहाचे भरते; पुरंदावडेत रंगले गोल रिंगण

माळशिरस, (जि. सोलापूर) : आषाढी वारीसाठी पंढरीच्या दिशेने निघालेला संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी (५ जुलै) सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला असून, पांडुरंगाच्या दर्शनाची आस घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांचा उत्साह आता शिगेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण मंगळवारी पुरंदावडे (ता. माळशिरस) येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडले. परब्रह्माच्या भेटीसाठी आतुर झालेल्या वारकऱ्यांनी टाळ, मृदंगाच्या तालावर असे रिंगण धरले. हा सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

काळ्याभोर ढगांनी भरलेले आकाश… भाविकांची प्रचंड गर्दी… पालखीशेजारी फडकणाऱ्या भगव्या पताका… मनोहरी रांगोळी… ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष… टाळ-मृदंगाचा गजर… अशा जल्लोषपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात ज्ञानोबा माऊलींच्या अश्वाने बेफाम वेगात दोन फेऱ्या मारून पुरंदावडे येथील गोल रिंगण रंगविले. ज्ञानोबा माऊलींचा रथ पुरंदावडे येथे दुपारी २.४० वाजता रिंगणाजवळ आला. त्याअगोदर अश्वासह दिंड्या बाहेरील रिंगणात होते. दिंड्यापाठोपाठ माऊलींच्या पालखीने बाहेरील रिंगणात प्रवेश केला. दरम्यान, दिंड्यांमधील पताकाधारी आणि तुळशीवाल्या महिलांना मध्यभागी प्रवेश देण्यात आला.

दिंड्यांतून वाट काढत पालखी बाहेरील रिंगणात मधोमध उभारलेल्या मंडपात विराजमान करण्यात आली. दरम्यानच्या काळात दिंड्यांमधील टाळ-मृदंगाचा गजर टिपेला पोहोचला होता. वारकरी देहभान विसरून नाचत होते. रिंगणापूर्वी रिपरिप पाऊस पडून गेला होता. दिंड्यांमध्ये हरिनामाचा गजर सुरू होता. रिंगणात रांगोळ्या काढल्या होत्या. रिंगणाची पाहणी बाळासाहेब चोपदार, उद्धव चोपदार यांनी केली. त्यानंतर ३ वाजून ४० मिनिटांनी भोपळे दिंडीच्या मानकऱ्याने रिंगणाला तीन फेऱ्या मारल्या. त्यानंतर स्वाराचा अश्व आणि माऊलींच्या अश्वाने रिंगणात दौड सुरू केली.

काही क्षणात दोन्ही अश्वांनी बेफाम वेगात रिंगणात दोन फेऱ्या मारल्या अन् माऊली नामाने अवघे रिंगण रंगून गेले. रिंगण संपताच अश्वांच्या टापाखालील माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. आता पंढरपूरजवळ आल्याने एकीकडे आनंद आणि रंगलेल्या रिंगणामुळे वारकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला. उडीच्या खेळानंतर रिंगणाची सांगता झाली. वारकऱ्यांची टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर पडणारी पावले अन् त्यातून उमटणारा ताल हा आनंद अनुभवण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. थोडा विसावा घेऊन ही पालखी नव्या दमाने पुढच्या दिशेने मार्गस्थ झाली.

Share