रणबीर कपूरच्या बहुप्रतीक्षित ‘शमशेरा’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या बहुप्रतीक्षित ‘शमशेरा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. करण मल्होत्रा दिग्दर्शित ‘शमशेरा’ या चित्रपटाच्या टीझरमुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली होती. या चित्रपटाच्या फर्स्ट लूक आणि टीझरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. ‘शमशेरा’ च्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ‘शमशेरा’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा हा ट्रेलर एक तासामध्येच १ मिलियनपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. सध्या सोशल मीडियावर ‘शमशेरा’च्याच ट्रेलरची चर्चा सुरू आहे.

पुढील महिन्यात २२ जुलैला ‘शमशेरा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लांबसडक दाढी, वाढलेले केस, हातात कुऱ्हाड आणि चेहऱ्यावरचे हावभाव असा रणबीर कपूरचा ‘शमशेरा’च्या ट्रेलरमधील अंदाज विशेष लक्ष वेधून घेत आहे. त्याचबरोबर अभिनेता संजय दत्तचा लूकही अगदी कमालीचा आहे. संजय दत्तचा कधीही न पाहिलेला लूक आणि भूमिका या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. संजय दत्तने याआधीही रुपेरी पडद्यावर नकारात्मक भूमिका साकारली आहे;पण या चित्रपटामधील त्याची भूमिका काहीशी वेगळी असल्याचे पाहायला मिळत आहे.

https://youtu.be/UHYUeZ8JszQ

‘शमशेरा’ या चित्रपटात सोना आणि शमशेराची प्रेमकथा प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. ‘शमशेरा’ चित्रपटाची कथा १८०० च्या दशकामधील आहे. इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सुरू असलेली लढाई या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अभिनेत्री वाणी कपूर या चित्रपटामध्ये सोना हे पात्र साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे ‘संजू’ चित्रपटानंतर रणबीर कपूर जवळपास चार वर्षानंतर रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. याआधी रणबीरला प्रेक्षकांनी प्रेमकथेवर आधारित चित्रपटांमध्ये पाहिले आहे. ‘शमशेरा’ हा रणबीरसाठीही तितकाच महत्त्वाचा चित्रपट आहे. यशराज फिल्म्स बॅनरअंतर्गत तयार झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन करण मल्होत्राने केले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लडाखमध्ये करण्यात आले आहे. येत्या २२ जुलैला ‘शमशेरा’ बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.

Share