ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बंडखोरांना खुले आव्हान 

मुंबई : मला वाटले मुख्यमंत्रिपदाची खुर्ची हलतेय; पण ते मानेचे दुखणे होते. कोरोनामुळे डोळ्यात पाणी आले आहे, ते अश्रू नाहीत. कोण कसे वागले यात आपल्याला जायचे नाही. ‘वर्षा’ बंगला सोडला म्हणजे मी मोह सोडला; पण जिद्द सोडली नाही, अजूनही जिद्द कायम आहे. मी बरा होऊ नये म्हणून काही जण पाण्यात देव ठेवून बसलेत, मेलो तरी शिवसेना सोडणार नाही म्हणणारे पळून गेले, बंडखोरांकडून शिवसेना फोडण्याचे पाप करण्यात आले आहे. ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा, माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरून दाखवा, असे खुले आव्हान मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बंडखोरांना दिले.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले आहे. शिंदे यांच्या बंडाचा आजचा चौथा दिवस आहे. शिवसेनेकडून खा. संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना मुंबईत येऊन चर्चा करण्याची ऑफर दिली आहे. मात्र, ही ऑफर एकनाथ शिंदेंनी धुडकावून लावली आहे. सध्या शिंदे गटात ४० शिवसेना आमदार असून, शिवसेनेतील आणखी बरेच पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. या साऱ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी (२४ जून) मुंबईत शिवसेना भवनात शिवसेनेचे सर्व जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली. मुख्यमंत्री आणि शिवसेना त्यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे. खा. विनायक राऊत, डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह सर्व पदाधिकारी शिवसेना भवनात उपस्थित होते.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?
सत्ता आल्यानंतर आधी कोव्हिडचे विचित्र लचांड गेल्या दोन वर्षांपासून मागे लागले आहे. कोव्हिड संपतो ना तर संपतो मानेचा त्रास सुरू झाला आणि आता हा त्रास. कोण कोणत्या वेळी कसे वागेल हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. मी त्या दिवशी माझ्या मनातले सगळे सांगितले, आजही मन मोकळे करतोय. माझ्या मानेवर शस्त्रक्रिया केली तेव्हा मोदींनीही मला फार हिंमतीचे काम केले, असे सांगितले होते. त्यावेळी मी हिंमत माझ्या रक्तात आहे असे सांगितले होते. पहिल्या ऑपरेशनच्या वेळी सगळे ठीक होते; पण एक दिवस उठल्यानंतर शरीरातील काही भागांच्या हालचाली होत नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचा फायदा घेत विरोधकांनी डाव साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आदित्य ठाकरे परदेशात होते, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

आदित्यला विठ्ठलाभोवतीचा बडवा म्हणता, मग स्वत:चा मुलगा खासदार, हे कसे चालते?
‘आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय’, असे तुणतुणे कायम वाजवणाऱ्या शिवसेना आमदारांचा उद्धव ठाकरे यांनी यावेळी चांगलाच समाचार घेतला. आधी बाळासाहेब विठ्ठल आणि आम्ही बडवे, आता मी विठ्ठल आणि इतर बडवे हीच गोष्ट उद्या आदित्यसोबतही घडणार नाही का? आदित्यला बडवे म्हणायचे आणि स्वत:चा मुलगा खासदार हे कसे चालते, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. तुम्हाला तुमच्या मुलाला मोठे करावेसे वाटते, मग मला वाटणार नाही का, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी विचारला.

एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केले?

एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केले? माझ्याकडची दोन खाती शिंदेंना दिली. नगरविकास खाते नेहमी मुख्यमंत्र्यांकडे असते; पण ते खाते शिंदेंना दिले. संजय राठोड यांचे वन खाते माझ्याकडे घेतले. साधी खाती मी माझ्याकडे ठेवली. संजय राठोडांवर वाईट आरोप होऊनही मी त्यांना सांभाळले. विठ्ठल-बडव्यांवर जे बोलत आहेत, त्यांचा पोरगा खासदार आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंवर मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला.

मुख्यमंत्रिपद माझ्यासाठी गौण
बाहेरच्या भाडोत्री लोकांकडून आपल्यात वाद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. आपलीच काही लोकं घेऊन शिवसेनेवर सोडण्यात आली. मात्र, सेनेच्या अस्तित्वावर बोलणाऱ्यांना निष्ठा काय असते दाखवावी लागेल. बाळासाहेब असताना ते विठ्ठल आणि मी बडवा होतो, आता मी विठ्ठल आणि आजूबाजूचे बडवे. मला आता या सगळ्या आरोपांचा वीट आला आहे. ही वीट ठेवून चालणार नाही, तर अशा लोकांच्या डोक्यावर हाणणार आहे. यांना ठेवून काय करू? हे सारे भाजपने केलेय, तिथे गेलेल्यांची आग्य्राहून सुटका करावीच लागेल. तुम्हाला जर तिथे भविष्य दिसत असेल तर खुशाल जा, मी थांबवणार नाही. मी लायक नसेन तर पद सोडायला तयार आहे, मुख्यमंत्रिपद माझ्यासाठी गौण आहे. कारण, बाळासाहेबांसाठी माझ्याहून लाडकं अपत्य म्हणजे शिवसेना होती, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

माझे मुख्यमंत्रिपद मान्य नसणे ही राक्षसी महत्त्वाकांक्षा
माझे मुख्यमंत्रिपद मान्य नसणे ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. झाडावरची फुले न्या, फांद्या न्या, मूळ मात्र नेऊ शकत नाही. जे सोडून गेले त्यांचे मला वाईट का वाटावे? आमदारांना फूस लावून मी सत्तानाट्य का घडवेन? असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावरील टीकेला उत्तर दिले. उद्धव ठाकरेंनी यावेळी एकनाथ शिंदेंसोबत आमदार गुजरातला गेल्याची माहिती मिळाल्यानंतर काही आमदारांना निवासस्थानी बोलावले होते, अशी माहिती दिली. यावेळी त्यांनी काही झाले तरी शिवसेना सोडून जाणार नाही, असे सांगितले होते; पण त्यावेळी उपस्थित असणारे दादा भुसे, संजय राठोड शब्द देऊनही निघून गेले. अशा लोकांचे करायचे काय? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी करत वाईट वाटत असल्याचे म्हटले. काही आमदार तिकीट कापले तरी जाणार नाही, असे म्हणाले होते; पण आता गेले आहेत तर जाऊ द्या. निधी मिळाला नाही म्हणून अनेकांनी तक्रारी केल्या. मी तर सर्व पातळीवर निधी वाटपाचे काम करत आलो आहे. शिवसेनेत बंड झाल्यानंतर दोन वेळा शिवसेना सत्तेत आली आणि दोन्ही वेळा मी त्यांना महत्वाची पदं दिली, असा उल्लेख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचा नामोल्लेख न करता केला.

घाणेरडे आरोप करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून मी बसणार नाही
तुम्हाला हवे आहेत तितके आमदार घेऊन जा; पण जोपर्यंत बाळासाहेबांनी रुजवलेली मूळं आहेत तोवर शिवसेना संपणार नाही. जे सोडून गेलेत ते माझे कधीच नव्हते. मूळ शिवसेना माझ्यासोबत आहे. ज्यांना आपण मोठे केले, त्यांची स्वप्नं मोठी झाली, ती मी पूर्ण करू शकत नाही. त्यांनी खुशाल जावे, बाळासाहेबांनी आम्हाला हे शिकवलेले नाही. भाजपसोबत जावे यासाठी माझ्यावर काही आमदारांचा दबाव आहे. माझ्या कुटुंबावर, ‘मातोश्री’वर घाणेरडे आरोप करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून मी बसणार नाही. मी शांत आहे, षंढ नाही.
स्वप्नातसुद्धा विचार न केलेल्या पदावर मी आलो; पण मला पदाचा मोह नाही. मला सत्तेचा लोभ नाही, मी ‘वर्षा’ सोडून ‘मातोश्री’वर राहायला आलो आहे. आपल्या माथी अनेकदा पराभव झाला; पण त्याने फरक पडत नाही. जिंकणे, पराभव मनावर अवलंबून असते. हारल्यानंतर जिंकण्यासाठी जनता साथ देत असते. बुडते ती निष्ठा आणि तरंगते ती विष्ठा. सेनेत माझ्यासोबत जी बुडेल ती निष्ठावंत सेना आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

बाळासाहेबांसाठी माझ्याहून लाडकं अपत्य म्हणजे शिवसेना
शिवसैनिकांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले, जो कोणी समोर येईल त्याच्यावर मी विश्वास ठेवेन. शिवसेनेचा पहिला नारळ फुटला होता तशीच परिस्थिती आहे असे समजा. तुम्हाला तिथे भवितव्य दिसत असेल तर खुशाल जावा, मी थांबवणार नाही. तुम्हाला वाटत असेल तर सांगा, मी हे पद आनंदाने सोडण्यास तयार आहे. शिवसेना चालवण्यासाठी नालायक आहे असे वाटत असेल तर मागचा फोटो काढून टाका आणि मी बाळासाहेबांचा मुलगा आहे, हे विसरून जा. शिवसेना पुढे नेण्यासाठी तुम्ही समर्थ आहात. बाळासाहेबांसाठी माझ्यापेक्षा शिवसेना लाडकं अपत्य आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Share