मुंबई : भोंग्याविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा देशासाठी आहे. जसे नोटाबंदी देशभर केली, लॉकडाऊन देशभर केला, मग भोंगाबंदी देशभर करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान भोंग्याच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मागील आठवड्यात राज्याच्या गृहमंत्र्यांनी एक सर्वपक्षीय बैठक घेतली. भोंग्याविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा संपूर्ण देशासाठी लागू आहे. त्यामुळे याबाबत केंद्र सरकारने काही नियम केले आणि ते सर्वच राज्यांसाठी लागू केले तर राज्या-राज्यांमध्ये वेगळी परिस्थिती निर्माण होणार नाही. भोंग्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे, त्यामध्ये केंद्र सरकार ही एक पार्टी होती, केंद्र सरकारने तो आदेश काढला पाहिजे. त्यामध्ये देखील तो जर का निकाल तुम्ही नीट वाचला, तर तो सर्वधर्मीयांना आणि सर्वांना तो लागू आहे. त्यामुळे नुसते एखादे भोंगे काढा असे नाही, मग आपल्याला सर्व धर्मीयांना ते पाळावे लागेल.
महाविकास आघाडीच्या सरकारची सूत्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हातात असल्याचा आरोप केला जातो. या आरोपावर उद्धव ठाकरे म्हणाले, मी अशा आरोपांचा विचारही करत नाही. सरकार उत्तम चाललं आहे. अगदी पवारसाहेबांबद्दल बोलायचं झालं तर एखाद्या वडीलधाऱ्याप्रमाणे ते मार्गदर्शन करत असतात. त्यांची आणि बाळासाहेबांची मैत्री होती. मात्र, त्यांच्या वागण्यात कसलाही रूबाब नसतो. आमच्या थोड्याफार इकडच्या-तिकडच्या गप्पा होतात. तिन्ही पक्ष मिळून चांगलं काम करत आहोत. महाविकास आघाडीत एकत्र हेच सूत्र आहे.
आमच्या सरकारने अर्धा कार्यकाळ पूर्ण केला याचे विरोधकांना आश्चर्य
उद्धव ठाकरे म्हणाले, पूर्वी महाराष्ट्रात दोन पक्ष विरुद्ध दोन अशी स्थिती होती. आता तीन पक्षांविरोधात एक पक्ष अशी स्थिती आहे. आधी लोकांना आम्ही तीन पक्ष आलो त्याचे आश्चर्य वाटले, आता तीन पक्षांच्या सरकारने अर्धा कार्यकाळपूर्ण केला याचं विरोधकांना आश्चर्य वाटतेय. तीन वेगवेगळ्या विचारधारेच्या पक्षांनी एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने मजबुतीने सरकार चालवले. हे एक-एक आश्चर्याचे धक्के विरोधकांना बसत आहेत. जोपर्यंत एकमेकांच्या मनात पाप येत नाही, कोणाच्या मनात पाठीत खंजीर खुपसण्याचा विचार येत नाही तोपर्यंत आम्ही या दोन पक्षांसोबत आहोत, असे म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला.
हा तमाशा कशासाठी?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी इशारा दिल्यानंतर मोठे वादंग निर्माण झाले होते. यावर बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, त्यांना हाताळण्यात नाही, त्यांना हाताळणारे हात खूप आहेत माझ्याकडे. त्यांच्यापासून त्यांना वाचवण्यात मी कमी पडतो की काय? अशी मला भीती वाटते. कारण, अशा लोकांना हाताळणारे खूप आहेत, लाखो-करोडो हात आहेत. त्यामुळे हाताळण्याची मला काही चिंता नाही, उलट वाचवण्याची चिंता पडते. हे तमाशे कशासाठी पाहिजेत? अचानक असे काय झाले आहे की, तुम्हाला एकदम हनुमान चालिसा आठवली? असे नेमके तुम्हाला काय वाटले की, हे केले पाहिजे? माझे मत आहे की, प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वागले पाहिजे. कारण, आपल्यासमोर संकटं कमी नाहीत, ते येतच आहेत, असेही ठाकरे म्हणाले.
राजकारण या पातळीवर कधीच गेले नव्हते!
२०१७ साली तीन पक्षांच्या युतीची शिवसेनेला माहिती नव्हती. यांचं छुप्या रितीने काय चाललंय? हे आम्हाला माहिती नव्हतं. तीन पक्षाची युती आम्हाला तरी सांगितली नव्हती. माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भाजप-सेनेच्या युतीत झाली. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पर्याय आलेला नव्हता. २०१७ ला असं नेमकं असं काय घडलं होतं की, यांना युती करावी वाटली. आम्ही कुठेही फरफटत गेलो नाही, उलट भाजपला समजत नाही की, आता करायचे काय? कारण, शिवसेना त्यांच्यासोबत जाणार होती. त्यावेळी तर राष्ट्रवादी दोन दिवसांत जाणार होती. काँग्रेसचे आमदार फुटणार होते, अडीच वर्ष झाली काहीच होत नाही. ‘ईडी’ वगैरे सगळे झाले. आता तर लोकांच्या मनात तीव्र संताप उफाळून यायला लागला आहे. जी तुमची थेरं चाललेली आहेत की, यावर धाड, त्यावर धाड. माझ्या झोपडपट्टीतील कार्यकर्त्यावर धाड. त्यावरून लोकांचे पोट कुठे भरतेय? असे राजकारण आपल्या लोकांनी कधी बघितलेले नाही. खोटे आरोप करून आपली राजकीय पोळी भाजायची; पण जनतेच्या पोळीचे काय? या पातळीवर राज्यातील राजकारण कधीच गेले नव्हते, देशातलेही गेले नव्हते, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.
सरकार पाडण्याचा आणि छळण्याचा आटापिटा करू नका…
माझी आजही अशी प्रामाणिक इच्छा आहे की, अजूनही वेळ गेलेली नाही. आम्ही तीन पक्षांनी सरकार बनवलं आणि चालवलं देखील आहे. त्यामुळे हे सरकार चालू द्या. निवडणूक येणारच आहे, जनता निवडणुकीत काय करायचं ते बघेल. त्यामुळे आम्ही तीन पक्षांनी सरकार बनवलं ते योग्य की अयोग्य हे जनता ठरवेल. ती वेळ येत नाही तोपर्यंत तुम्ही हे सरकार पाडण्याचा आणि छळण्याचा आटापिटा करू नका. तसं झालं तर नाईलाजाने तुमच्या शासनामुळे पीडित झालेली सर्व राज्यं एकत्र आल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकार आणि भाजपला यावेळी दिला.