ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण काळाच्या पडद्याआड

मुंबई : ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज रविवारी (१ मे) पहाटे निधन झाले. त्‍या ६१ वर्षांच्‍या हाेत्‍या. प्रेमा किरण यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.


माहेरचा आहेर, अर्धांगी, दे दणादण, गडबड घोटाळा, धूमधडाका, सौभाग्यवती, सरपंच, पागलपन, अर्जुन देवा, कुंकू झाले वैरी, लग्नाची वरात लंडनच्या घरात अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. प्रेमा किरण यांनी अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, दादा कोंडके, अशोक सराफ यांच्या बरोबरचे त्यांचे अनेक चित्रपट गाजले. ‘धूमधडाका’ या चित्रपटातील ‘पुलिसवाल्या सायकल वाल्या’ हे गाणे लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रेमा किरण यांच्यावर चित्रीत झालेले गाणे प्रचंड गाजले होते.

 

प्रेमा किरण यांनी चित्रपटांसह अनेक मालिकांमध्येही अभिनय केला आहे. त्यांनी १९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उतावळा नवरा’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. प्रेमा किरण यांनी केवळ मराठी चित्रपटातच नव्हे तर तर गुजराती, भोजपुरी, अवधी, बंजारा या भाषेतील चित्रपटांमध्ये काम करत महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

Share