काँग्रेस आता केवळ भाऊ-बहिणीचा पक्ष बनला आहे : जे. पी. नड्डा

नवी दिल्ली : काँग्रेस हा आता राष्ट्रीय, भारतीय किंवा लोकशाहीवादी पक्ष राहिला नसून केवळ भाऊ आणि बहिणीचा पक्ष बनला आहे, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केली. घराणेशाहीवर चालणारे पक्ष एका व्यक्तीच्या हिताचा विचार करतात आणि असे राजकीय पक्ष लोकशाहीसाठी धोकादायक असतात, असेही ते म्हणाले.

नवी दिल्लीत आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. ‘घराणेशाहीवर चालणाऱ्या राजकीय पक्षांचा लोकशाहीला धोका’ हा या चर्चासत्राचा विषय होता. या चर्चासत्रात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ​​केंद्रीय मंत्री आरसीपी सिंग, ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघमचे (एआयएडीएमके) एम. थंबी दुराई आणि भाजपचे राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

जे.पी. नड्डा यांनी यावेळी काँग्रेससह भारतातील विविध राज्यातील प्रादेशिक पक्षांवर टीका केली. घराणेशाहीवर चालणाऱ्या राजकीय पक्षांचा उद्देश हा केवळ सत्ता हस्तगत करणे हा असतो, असा आरोप नड्डा यांनी केला. प्रादेशिक पक्षांच्या उदयाला आणि विस्ताराला काँग्रेस जबाबदार असल्याचे सांगून ते म्हणाले, प्रमुख विरोधी पक्षाने राष्ट्रीय राजकारणात प्रादेशिक प्रश्नांना वाव दिला नाही. जे घराणेशाहीचे पक्ष आहेत, त्यांचे लक्ष्य केवळ सत्ता मिळवणे आहे. त्यांची कोणतीही विचारधारा नाही. त्यांचे कार्यक्रमही उद्दिष्टरहित असतात. तसेच प्रादेशिक पक्षांचे लक्ष्य हे आहे की, सत्तेत यावे. याचा अर्थ आणि त्यासाठी ते जातीच्या किंवा धर्माच्या आधारे ध्रुवीकरण करण्यास मागे-पुढे पाहत नाहीत.

प्रादेशिक पक्षही आता कौटुंबिक पक्षात बदलले
प्रादेशिक पक्ष हळूहळू काही लोकांच्या ताब्यात गेले आहेत आणि आता त्या प्रादेशिक पक्षांमधील विचारधारा बदलून कुटुंबे पुढे आली आहेत, असा आरोप नड्डा यांनी केला. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचा संदर्भ देत काँग्रेस आता केवळ भाऊ आणि बहिणीचा पक्ष राहिला आहे, अशी टीका जे.पी. नड्डा यांनी केली. भाजपमध्येच केवळ अंतर्गत लोकशाही आहे. भाजप विविधेमध्ये एकतेला प्राधान्य देतो. प्रादेशिक अस्मितांना, प्रश्नांना योग्य प्रतिनिधीत्त्व देऊन राष्ट्रीय भावना मजूबत राहील याची दक्षता आमचा पक्ष घेतो, असेही नड्डा म्हणाले.

जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगाणा या राज्यात घराणेशाहीवर चालणारे राजकीय पक्ष असल्याचा आरोप नड्डा यांनी केला. विविध राजकीय पक्षांचा उल्लेख करत हे प्रादेशिक पक्षही आता कौटुंबिक पक्षात बदलले आहेत. नड्डा यांनी टीएमसीचे “दीदी-भतीजे की पार्टी” असे वर्णन केले. तसेच झारखंडमध्ये बाबूजी म्हातारे झाल्यानंतर त्यांचा मुलगा (झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन) यांनी पक्षाचा ताबा घेतला असल्याचा आरोप नड्डा यांनी केला.

Share