मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे हे अयोध्या दौऱ्यापूर्वी पुण्यात सभा घेणार आहेत. या सभेसाठी पुणे पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नाही. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज याबाबत भाष्य केले. राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेला परवानगी नाकारण्याचे कारण दिसत नाही. पोलिस आयुक्त या सभेला परवानगी देतील. मात्र, मनसेने पोलिस आयुक्तांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे वळसे-पाटील यांनी सांगितले.
ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी दिलीप वळसे-पाटील यांनी सोमवारी पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या राड्यासंदर्भातही भाष्य केले. यासंदर्भात पोलिस योग्य ती कारवाई करतील. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चूक केली असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल. भाजपच्या कार्यकर्त्यांची चूक असेल तर त्यांच्यावरदेखील कारवाई होतील. भाजपच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण करणे ही आक्षेपार्ह व निंदनीय बाब आहे. यासंदर्भात पुणे पोलिस योग्य ती कारवाई करतील, असे वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.
अयोध्या दौऱ्यापूर्वी राज ठाकरे यांची पुण्यात जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) पुणे पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज केला होता. ही परवानगी मिळाल्यानंतर राज यांच्या सभेची तारीख निश्चित होईल. सूत्रांच्या माहितीनुसार, २१ मे किंवा २९ मे रोजी राज ठाकरे यांची सभा होण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे वसंत मोरेंशी चर्चा करणार
दरम्यान, राज ठाकरे हे आजपासून पुण्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफूस सुरु असल्याचे दिसत आहे. मनसेच्या कोअर कमिटीमधील काही नेत्यांकडून माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांना सातत्याने डावलले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. वसंत मोरे यांनी या सगळ्याची तक्रार वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज किंवा उद्या वसंत मोरे यांच्याशी चर्चा करतील, असे समजते.