भोंग्याबाबत कोणतीही हुकूमशाही चालणार नाही

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल औरंगाबाद येथील सभेत केलेले भाषण म्हणजे मागील भाषणाचेच रिपीटेशन आहे. येथे कायद्याचे राज्य आहे. राज्यघटना, कायदे, नियम सर्वांना सारखे आहेत. त्यामुळे भोंग्याबाबत कोणतीही हुकूमशाही चालणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी राज ठाकरे यांना दिला.

नाशिक येथे कृषी विभागातर्फे आज (२ मे) राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांच्या औरंगाबाद येथील भाषणाचा चांगलाच समाचार घेतला. घरी बसून आणि सभेत बोलायला काय जातं? कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिस कारवाई करतील, असा थेट इशारा अजित पवार यांनी राज ठाकरे यांना यावेळी दिला.

अजित पवार म्हणाले, राज ठाकरे कोणत्याच एका भूमिकेवर ठाम नसतात. त्यांची भूमिका वेळोवेळी बदलत असते. राज ठाकरे पलटी मारणारा माणूस आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे यांनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांविरोधात रान पेटवले. संपूर्ण महाराष्ट्रात भाजपविरोधात झंझावाती प्रचार केला आणि आता ते भाजपच्या इशाऱ्यावर बोलत आहेत. कालच्या सभेत नक्कल आणि टीकेशिवाय राज ठाकरेंनी काय केले? असा सवालही अजित पवार यांनी विचारला.

राज ठाकरे स्वत: जास्त जातीयवादी
शरद पवारांनी जातीपातीचे राजकारण केले. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीयवाद वाढला, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पवारसाहेबांचे सगळं राजकारण बघितलं तर कुठेही जातीयवादी राजकारण दिसणार नाही. त्यांनी सर्वधर्मसमभावाचं राजकारण केलं.पवारसाहेबांवर काही बोलले म्हणजे प्रसिद्धी मिळते म्हणून काहीजण विनाकारण नको ते बोलतात. राज ठाकरेंचेही तसेच आहे. राष्ट्रवादीला आणि पवारसाहेबांना जातीयवादी म्हणणारे राज ठाकरे स्वत:  जातीयवादी आहेत. शरद पवार हे जातीयवादी नेते नाहीत हे केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलेले आहे. शरद पवार यांची ५० वर्षांची कारकिर्द तुमच्यासमोर आहेच. एखादी व्यक्ती तर धादांत खोटे बोलत असेल तर तिच्या बोलण्याला किती महत्व द्यायचे? असा सवाल अजित पवार यांनी केला.

अजित पवारांनी केली राज ठाकरेंची नक्कल
राज ठाकरे कधी दुपारी भर उन्हात सभा घेत नाहीत. सूर्य मावळला, संध्याकाळ झाल्यानंतर वातावरण चांगले झाले की मग हे सभा घेतात. मग ते नॅपकिनने तोंड पुसत असतात. (यावेळी अजित पवार यांनी नॅपकीन मागवला आणि राज ठाकरे यांची तोंड पुसण्याची नक्कल केली) ते काय पुसत असतात काय माहीत. काय शिंकरायचे आहे ते एकदाच शिंकरून घ्या ना, अशा शब्दात अजित पवार यांनी राज ठाकरे यांची नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली.

आत्मपरीक्षणाची गरज
राज ठाकरेंनी आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. एकेकाळी १३ आमदारांचा पक्ष असलेला मनसेचा आता एकच आमदार आहे. बाकी नेते पक्ष सोडून का गेले? आमदारांची संख्या कमी का झाली? नुसती भाषणं करून जनतेचे प्रश्न सुटत नाहीत किंवा रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही, असा टोमणाही अजित पवारांनी मारला.

Share