राष्ट्रवादीच्या पाठिंब्याशिवाय गोव्यात सरकार बनणार नाही

पणजी : गोव्यामधील तरुणांना रोजगार नाही, पर्यटनासंबंधी काही प्रश्न आहेत, तसेच गोव्याची संस्कृती जतन करण्याचीही गोवेकरांची मागणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस १३ जागांवर निवडणूक लढवत आहे. कोणत्याही पक्षाला गोव्यात स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बिगर भाजप आघाडीला पाठिंबा देऊन गोवेकरांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देईल, असे प्रतिपादन गोवा विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करतांना ते म्हणाले आहेत.

नवाब मलिक म्हणाले की, गोवा हे पूर्वी शेतीप्रधान राज्य होते. आताही गोव्यात ३० टक्के लोक शेती करत आहेत. मात्र त्यांना सिंचनाच्या सुविधा दिलेल्या नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास सिंचनाच्या व्यवस्था, ग्रीन हाऊसेसची सुविधा, फळबाग-फुलबागा फुलविण्यासाठी विविध अनुदाने देण्यात येतील. पशूसंवर्धन व पशूपालनाच्या माध्यमातून जोडधंदा देण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच गोव्यात ॲक्वा फिशिंग कमी होत आहे. समुद्रातील मासेमारीसोबत फिश फार्मिंगसाठी प्रोत्साहन दिले जाईल, असे नवाब मलिक यांनी सांगितले. गोव्यामध्ये शेतीत काम करण्यासाठी शेतमजूर मिळत नाहीत, अशी बाब अनेकांनी निदर्शनास आणून दिली. शेतमजूर मिळवून देण्यासाठी मनरेगासारखी योजना गोव्यासाठी तयार करता येईल का? याचाही विचार राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यास करेल.

गोव्यात पर्यटन हा सर्वात मोठा व्यवसाय आहे. गोव्यात कुटुंबआधारीत पर्यटन कसे वाढवता येईल, याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असेही नवाब मलिक म्हणाले. सध्या गोव्यात कसिनोप्रधान टुरिझम आहे. मध्यमवर्गीयांना गोव्याचे पर्यटन परवडत नाही. त्यासाठी फॅमिली संकल्पना सुरु करणार आहोत. गोव्यात राहणाऱ्या स्थानिकांच्या घरात पुरेशा खोल्या असतील तर त्यांना पर्यटन परवाना देऊन त्यांना व्यवसाय करण्याची मुभा देण्यात येईल. जेणेकरुन सामान्य लोकही पर्यटन व्यवसाय करु शकतील. तसेच घरातच हॉटेल सुरु करण्याची मुभा देण्यात येईल. त्यामुळे गोव्याच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरु करता येईल, अशी आशा मलिक यांनी व्यक्त केली.

Share