भूपिंदर सिंग हनीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पंजाब- पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी  यांचा पुतण्या भूपिंदर सिंग हनी याला अवैध वाळू उत्खनन प्रकरणी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. २०१८ मध्ये अवैध वाळू उत्खनन प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या तपासा दरम्यान भूपिंदर सिंहचे नाव समोर आले होते. यानंतर ईडीने या वर्षी जानेवारी महिन्यात भूपिंदर सिंग आणि त्याच्या साथीदारांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले होते. छाप्या दरम्यान ईडीने १० कोटी रुपयांची रोकड, २१ लाख रुपयांचे दागिने आणि रोलेक्स घड्याळ जप्त केले होते. ही कारवाई राजकीय हेतूने केली असल्याचा दावा काँग्रेसने  केला आहे.

भूपिंदर सिंगला ईडीने शुक्रवारी जालंधर न्यायालयात हजर केले. याआधीच्या दोन सुनावणींमध्ये न्यायालयाने भूपिंदरसिंग हनीचा ताबा ईडीकडे दिला होता. ईडीने ३ ते ४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री भूपिंदर सिंगला अटक केली होती. यानंतर तो ८ फेब्रुवारीपर्यंत आणि पुन्हा ११ फेब्रुवारीपर्यंत ईडीच्या कोठडीत होता.

 

Share