हा तर पुरुषी मानसिकतेतील पुरुषप्रधान अर्थसंकल्प – चित्रा वाघ

मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प साद केल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी अर्थसंकल्पावरून ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. हा तर पुरुषी मानसिकतेतील पुरुषप्रधान अर्थसंकल्प असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे. त्यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट मध्ये म्हटलं की, राज्याचा अर्थसंकल्प हा पुरुषी मानसिकतेतील पुरुषप्रधान असा आहे. महाराष्ट्राची सध्याची लोकसंख्या १२ कोटी ५० लाख आहे. यामध्ये महिला ६ कोटी १ लाख आहेत. महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून असतात तर प्रोजेक्शन का नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलींसाठी विशेष तरतूद हवी होती असेही त्या म्हणाल्या.

अर्थसंकल्पाविषयी नाराजी दर्शवताना चित्रा वाघ म्हणाल्या, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा खरा कणा या महिला आहेत. किमान त्यांच्यासाठी विशेष तरतूद करणे अपेक्षित होते. शेतकरी महिला, बचतगटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार निर्मिती प्रोत्साहनासाठी काहीही तरतूद केली नाही. लघु उद्योगातील महिलांच्या तोंडाला पानं पुसण्याचे काम या सरकारने केले आहे अशी टीका त्यांनी केली आहे.

आशा सेविकांविषयी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, आशांना कोविड काळात दिवसाला ३५ रू देण्याचे शासनाने आश्वासन दिले होते. मात्र त्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. थोडी जरी कळवळ असेल तर तात्काळ राज्यभरातील आशांचे पैसे देऊन टाका असेही त्या म्हणाल्या.

Share