‘मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती, दिलेला शब्द मोडला’: संभाजीराजेंचा गंभीर आरोप

मुंबई : छत्रपती संभाजी राजे यांनी राज्यसभेची निवडणूक लढणार नसल्याची मोठी घोषणा केली आहे. आज मुंबई येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती, त्यांनी मला दिलेला शब्द मोडला असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. संभाजीराजे आणि मुख्यमंत्री, शिवसेनेचे शिष्टमंडळ यांच्यात नेमकी काय चर्चा झाली होती याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

संभाजीराजे यांनी म्हटलं, जे मी आता बोलणार आहे…. ते माझ्या तत्वात नाही…. पण मी बोलणार आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना सांगू इच्छितो की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याजवळ आपण दोघांनी जावं आणि संभाजीराजे खोटं बोलत असेल तर तुम्ही सांगावं. मुंबईत आल्यावर दोन खासदार मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे पाठवले. या दोघांनी मला सांगितलं की, तुम्ही शिवसेनेत प्रवेश करा आणि उद्या तुमची उमेदवारी जाहीर करतो. पण मी सरळ सांगितलं की, मी निवडणूक अपक्ष लढणार आहे.

त्यानंतर दोन दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना मी भेटायला गेलो. तिथे तीन मुद्द्यांवर चर्चा झाली. पहिला प्रस्ताव होता की, शिवसेनेत प्रवेश करावा. मी सांगितलं मला अपक्ष म्हणून निवडणूक लढवायची आहे आणि त्यावेळी मी शिवसेनेत प्रवेशाला नकार दिला असं संभाजीराजे यांनी म्हटलं.

संभाजीराजे पुढे म्हणाले, त्यानंतर मी म्हटलं, मी माझा प्रस्ताव सांगितला. शिवेसनेच्या माध्यमातून महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार मला जाहीर करा. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, राजे हे शक्य होणार नाही. पण मविआच्या वतीने शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार करण्यास आम्ही तुम्हाला तयार आहोत. पण मी मान्य केलं नाही आणि म्हटलं तुम्ही दोन दिवस विचार करा आणि मी सुद्धा विचार करतो. दोन दिवसांनी त्यांच्या मंत्री महोदयांचा फोन आला की मुख्यमंत्र्यांनी तुमच्यासोबत चर्चा करण्यासाठी सांगितलं आहे. त्यानंतर आमची बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला प्रस्ताव आणि मी दिलेलला प्रस्ताव या संदर्भात सुवर्णमध्य काढत एक ड्राफ्ट तयार करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला
त्यावेळी पुन्हा मला शिवसेनेत प्रवेशाचं म्हटलं, त्यावर मी नकार दिला. मग पुन्हा ड्राफ्टवर चर्चा झाली आणि हा ड्राफ्ट अंतिम झाल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर बातम्टा आल्या की, उद्या शिवसेनेत प्रवेश करणार म्हणून. त्यानंतर कोल्हापुरात पोहोचलो तेव्हा कळालं की, संजय पवार यांना उमेदवारी जाहीर. मग मंत्र्यांना फोन केला त्यांनी काही उत्तर दिलं नाही. मुख्यमंत्र्यांना फोन केला त्यांनीही फोन रिसिव्ह केला नाही. मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती त्यांनी मला दिलेला शब्द मोडला असं संभाजीराजे यांंनी म्हटलं.

Share