असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने आजपर्यंत पाहिलेला नाही! किरीट सोमय्या यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी १९ बंगल्यासंबंधी थोतांड नाटक केले. अनिल परबही त्याच माळेतले मणी आहेत. अहो, मुख्यमंत्री किती लबाडी करणार. असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने आजपर्यंत पाहिलेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन अनिल परब मीडियाला गंडवले, असे सांगतात, असा हल्लाबोल भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला.

शिवसेना नेते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्या शासकीय आणि खासगी निवासस्थानासह मुंबई, पुणे आणि दापोली येथील सात मालमत्तावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी छापे टाकून अनिल परब यांची चौकशी केली. या कारवाईनंतर अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधत दापोली येथील सदानंद कदम यांच्या मालकीच्या रिसॉर्टमधील सांडपाणी समुद्रात जात असल्याच्या तक्रारीच्या आधारे माझ्या घरांवर आणि माझ्याशी संबंधित व्यक्तींवर ‘ईडी’ने कारवाई केली असल्याची माहिती दिली. परब यांच्यावरील कारवाईने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. त्यातच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांचा सातबारा कोरा करणार, असा इशारा दिला आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. अनिल परब यांचे वक्तव्य ऐकल्यानंतर ‘तो मी नव्हेच’ या नाटकाची मला आठवण झाली. ‘तो मी नव्हेच’ नाटकासाठी प्रभाकर पळशीकरांना अनेक बक्षिसे मिळाली होती. आज जर ते नाटक पुन्हा करायचे ठरले तर अनिल परब यांना पसंती दिली जाईल. एक माणूस इतका नाटकी बनू शकतो हे उद्धव ठाकरेंनी आपल्याला दाखवून दिले. अनिल परब आपला दापोलीतील रिसॉर्टशी काही संबंध नसल्याचे म्हणत आहेत; पण मी उपस्थित केलेल्या १२ मुद्द्यांची उत्तरे का दिली जात नाहीत, अशी विचारणा किरीट सोमय्यांनी केली आहे.

‘ईडी’ चे अधिकारी कशासाठी आले होते हे मला माहिती नाही, माझा रिसॉर्टशी संबंध नाही, असे अनिल परब म्हणतात. १७ डिसेंबर २०२० ची पावती माझ्याकडे आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अनिल परब हे परिवहनमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री होते. अनिल परब यांनी २०२०-२१ चा मालमत्ता कर आपल्या खात्यातून भरला होता. ‘तो मी नव्हेच’ चे नाट्यकार अनिल परब यांनी याचे उत्तर द्यावे. याआधीही अनिल परब यांनी सर्व कर भरले होते. रिसॉर्ट सदानंद कदम यांचा आहे तर तुम्ही का कर भरत होतात, असा सवाल सोमय्या यांनी परब यांना विचारला आहे.

१६ हजार ६८३ स्क्वेअर फुटाचे बांधकाम असून, घर क्रमांक १०६२ यांच्या मालकीचे आहे. ही संपत्ती अनिल परब यांच्या नावे आहे. याचा बाजारभाव २५ कोटी रुपये आहे आणि अनिल परब माझा रिसॉर्टशी संबंध नाही असे सांगतात. अनिल परब आणि उद्धव ठाकरेंना चोरी, लबाडी, फसवणूक, गुंडगिरी, माफियागिरी केल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळेल, असा टोला सोमय्या यांनी यावेळी लगावला.

Share