शिवरायांच्या अपमान करणाऱ्यांना लवकरच ‘करारा जवाब मिलेगा’

मुंबई : राज्यातलं सरकार आणि सरकारच्या प्रमुख लोकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याची स्पर्धा लागली असल्याचे वक्तव्य ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, राज्यातलं सरकार आणि सरकारच्या प्रमुख लोकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जास्तीत जास्त अपमान कोण करतंय? ही स्पर्धा सुरू झालीये. मंगलप्रभात लोढाही त्यात सामील झाले आहेत. ठीक आहे. महाराष्ट्राची आणि देशाची जनता डोळे बंद करून बसलेली नाही. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना लवकरच ‘करारा जवाब मिलेगा’ असा इशारा संजय राऊतांनी दिला.

मंगलप्रभात लोढा राज्याचे पर्यटन मंत्री आहेत. किमान राज्याच्या पर्यटन मंत्र्याला तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास माहिती पाहिजे.राज्याचे पर्यटनमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना एका पक्षाशी बेईमानी करणाऱ्याशी करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज बेईमान होते का? तुम्ही छत्रपतींनाच एका अर्थाने बेईमान ठरवताय. भाजपाचे एक नेते सुधांशू त्रिवेदींनी छत्रपतींना माफीवीर ठरवलं, राज्यपालांनी छत्रपती जुने झाले असं सांगितलं आणि आता पुन्हा एकदा छत्रपतींची तुलना एका बेईमान व्यक्तीशी तुलना करून महाराष्ट्राचा अपमान केला आहे, असं राऊत म्हणाले.

सध्याचं खोके सरकारमध्ये कोण छत्रपतींचा सगळ्यात जास्त अपमान करेल याची स्पर्धा लागली आहे का? त्याला दिल्लीनं मोठं बक्षीस लावलंय का कौन बनेगा करोडपतीसारखं? ‘कौन करेगा छत्रपतीका अपमान’. असंच दिसतंय. जो उठतोय तो छत्रपतींचा अपमान करतोय. छत्रपतींचा अपमान हा हिंदुत्वाचा, महाराष्ट्राचा अपमान नाही का? छत्रपतींच्या आग्र्याहून सुटकेची तुलना तुम्ही बेईमान लोकांच्या बंडखोरीशी करत असाल, तर त्याला योग्य पद्धतीने लवकरच उत्तर दिलं जाईल, अशा शब्दांत संजय राऊतांनी मंगलप्रभात लोढांच्या विधानाचा समाचार घेतला.

Share