नवी दिल्ली : दिल्लीच्या जहाँगीरपुरी भागात शनिवारी हनुमान जन्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केली, तसेच अनेक वाहने पेटवून दिली. दगडफेकीनंतर झालेल्या हिंसाचारात नऊ जण जखमी झाले असून. त्यात आठ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आतापर्यंत १४ जणांना अटक केली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्व वातावरण आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेसंदर्भात दिल्लीचे पोलिस आयुक्त राकेश अस्थाना आणि विशेष पोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) दिपेंद्र पाठक यांच्याशी चर्चा केली असून, संवेदनशीलपणे हे प्रकरण हाताळताना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दिल्लीतील जहांगीरपुरी भागात हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हिंसेचा भडका उडाला. अज्ञात समाजकंटकांनी मिरवणुकीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली, तसेच काही जणांकडून तलवारी नाचवत दहशत माजविण्यात आली. मिरणुकीवर दगडफेक झाल्यानंतर वातावरण चिघळले. या हिंसाचारात एकूण नऊ जण जखमी झाले आहेत. यामध्ये आठ पोलिस कर्मचारी आणि एका नागरिकाचा समावेश आहे. या सर्वांना बाबू जगजीवन राम मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका पोलिस उपनिरीक्षकाला गोळी लागल्याने तो जखमी झाला असून, त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, १४ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये या मिरवणुकीवर गोळीबार करणाऱ्या एकाचा समावेश असून, पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त केले आहे.
‘ही पारंपरिक मिरवणूक होती आणि पोलिस पथक तिच्यासोबत होते. ही शोभायात्रा कुशल चित्रपटगृहाजवळ पोहोचल्यानंतर दोन समुदायांत संघर्ष झाला. यावेळी दगडफेक करण्यात आली. हा हिंसाचार थांबवण्याचा प्रयत्न करणारे पोलिस कर्मचारी दगडफेकीत जखमी झाले, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. दंगेखोरांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिल्लीचे पोलिस आयुक्त राकेश अस्थाना यांनी दिला आहे. परिस्थिती आता नियंत्रणात असून, जहाँगीरपुरीसह इतर संवेदनशील भागांत जादा पोलिस कुमक तैनात करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेचा निषेध केला असून, कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे. दिल्लीच्या जहांगीरपुरी परिसरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी राज्यभर सतर्कतेचा इशारा दिला आहे. वरिष्ठ पोलिसांना आपापल्या क्षेत्रांतील संवेदनशील परिसरात काळजीपूर्वक नियंत्रण ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी दिली.