कुशल बद्रिके इन्स्टाग्राम पेजवरील ‘त्या’ हृदयस्पर्शी पोस्टमुळे चर्चेत

मुंबई : अभिनेता कुशल बद्रिके म्हटले की, पोट धरून हसविणाऱ्या विनोदाची मेजवानी हमखास मिळतेच. कुशल बद्रिके हे नाव जरी घेतले तरी ओठावर हसू येते. त्याचे विनोदी किस्से ऐकून खळखळून हसायला येते. विनोदी कलाकार म्हणून तर त्याची ओळख आहेच; पण तो तितकाच संवेदनशीलही आहे. सोशल मीडियावर सतत सक्रिय असलेला कुशल त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर अशा काही पोस्ट करत असतो की, त्यावेळी हसण्यापेक्षा तो विचार करायला लावतो. नुकतीच त्याने मैत्री आणि आयुष्यातून हरवलेल्या मित्रांची आठवण करणारी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे कुशल पुन्हा चर्चेत आला आहे.

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या शोमधून कुशल बद्रिकेने आपल्या चतुरस्त्र अभिनयाने प्रेक्षकांवर मोहिनी घातली आहे. या शोमधून कुशलने साकारलेल्या विविध भूमिका आणि त्याच्या विनोदाचे टायमिंग किती अचूक आहे याची कल्पना येते. कुशल सध्या ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये कॉमेडी करत आहे. त्याचा विनोदवीर भाऊ कदम आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्यासोबतचा ‘पांडू’ हा सिनेमाही खूप गाजला. धमाल विनोदी व्हिडीओबरोबरच तो नेहमी वैचारिक विषयांवरही भाष्य करत असतो. पडद्यावर पोट धरून हसवणाऱ्या कलाकारांच्या पंक्तीत कुशल बद्रिके याने वरचे स्थान मिळवले आहे. स्किट करत असताना तर कुशल विनोदाचे पंच मारत असतोच; परंतु प्रत्यक्ष आयुष्यातही तो खूप मिश्किल आहे.

https://www.instagram.com/p/CUIdbI4IsBD/?utm_source=ig_web_copy_link

कुशल बद्रिकेने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कुशल ट्रेनच्या खिडकीतून बाहेर नजर लावून बसला आहे. त्याच्या चेहऱ्यावरही गंभीर भाव आहेत. या फोटोत त्याने रंगबेरंगी हुडी जॅकेट घातलं आहे. कुशलने लिहिलेल्या ओळी, त्याने घातलेली हुडी आणि त्याच्या आठवणी असा गोफ त्याने या पोस्टमध्ये विणला आहे. कुशलने प्रचंड संघर्ष करून छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. हे यश मिळवण्यासाठी मला खूप स्ट्रगल करावा लागला असल्याचे तो नेहमीच त्याच्या मुलाखतींमध्ये सांगत असतो. या त्याच्या प्रवासात त्याला मित्रांची साथ मिळाली. इतकेच नव्हे तर कुशलनेही त्याच्या मित्रांना मदत केली आहे; पण सध्याच्या व्यापात हे मित्रच कुठेतरी मागे सुटले आहेत आणि त्याचीच त्याला आठवण येत आहे की काय, असे कुशलने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर केलेल्या पोस्टवरून वाटते.

https://www.instagram.com/p/CeQfkkTLWT6/?utm_source=ig_web_copy_link

या पोस्टमध्ये कुशलने लिहिले आहे की, काही वर्षांपूर्वी माझ्याकडे ही अशी चित्र विचित्र रंगाची एक हुडी होती. ती हुडी मला खूप आवडायची; पण माझ्या एका मित्राला ती हुडी कधीच आवडली नाही. काळाच्या ओघात ती हुडी कुठे हरवली कुणास ठाऊक; परंतु फुलपाखराच्या रंगासारखे तिचे रंग मात्र आजही मनात कायम भरून राहिले आहेत. काही मित्रांचेही पुढे असेच त्या हुडीसारखे झाले. हरवले ते हरवलेच. रंग मात्र जमा होत राहिले. कुशलची ही पोस्ट फारच हृदयस्पर्शी आहे. या पोस्टवर कुशलच्या चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत; पण ज्या मित्रासाठी कुशलने ही पोस्ट लिहिली आहे तो हरवलेला मित्र त्याला लवकरात लवकर सापडावा, असे त्याच्या चाहत्यांनाही वाटतेय.

Share