‘उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलं’ नवनीत राणांची बोचरी टीका

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे फक्त बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार होऊ शकतात विचारांचे नाही, असं म्हणत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सडकून केली. तसंच, उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलं असं म्हणत बोचरी टिका केली आहे.

नवनीत राणा म्हणाल्या की, उद्धव ठाकरे यांच्‍या भाषणातून केवळ राग, द्वेष व्‍यक्‍त झाला, त्‍यात कुठलाही विचार झाला नाही. शिवसेनेचे खासदार, आमदार आणि मोठ्या संख्‍येने जमलेल्‍या लोकांनी ते बाळासाहेब ठाकरे यांच्‍या विचारांसोबत असल्‍याचे दाखवून दिले. माझा बाप चोरला, असे वक्तव्य करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून स्वतःचा अडीच वर्षाचा काळ आठवावा. खरेतर उद्धव ठाकरे यांचे संतुलन बिघडले आहे. त्यामुळे ते बाप चोरला, वगैरे अशी भाषा वापरत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची ठेवून त्याची विधिवत पूजा करण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे एकूण ४० आमदार आले आहेत. एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी महाराष्ट्रातील शेकडो शिवसैनिक सभेला उपस्थित होते.

 

उद्धव ठाकरे आपल्या सभेत सिनेमातील संवाद बोलत होते, अडीच वर्ष ते घरातच बसले होते. समाज माध्यमातून जनतेची कामे करणार, असे आश्वासन ते देत होते मात्र वास्तवात त्यांनी कुठलेही काम केले नाही”. अशी टीका देखील खासदार नवनीत राणा यांनी केली. नवनीत राणा म्‍हणाल्‍या, ”बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार हे एकनाथ शिंदे आहेत. यामुळेच त्यांच्या सभेला हजारोच्या संख्येत गर्दी उसळली. खरे शिवसैनिक हे एकनाथ शिंदेंसोबतच आहेत आणि भविष्‍यातही ते कायम राह‍तील, कारण बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्‍ववादी विचार पुढे नेण्‍याचे काम एकनाथ शिंदे करीत आहेत,” असे त्‍या म्‍हणाल्‍या.

Share