नुपूर शर्मांची पोस्ट व्हायरल केल्यानेच अमरावतीच्या उमेश कोल्हेंची हत्या; तपास ‘एनआयए’ कडे

अमरावती : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यानेच अमरावती शहरातील औषध विक्रेते उमेश कोल्हे (वय ५४) यांचा खून करण्यात आला असल्याचा खुलासा अमरावती पोलिसांनी केला आहे. उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मा यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्यानेच झाल्याची माहिती पोलिस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, या हत्या प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे सोपवला आहे. दरम्यान, या हत्या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त टिप्पणीचे समर्थन केल्याने राजस्थानच्या उदयपूरमध्ये कन्हैय्यालाल यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. उदयपूर हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले असताना महाराष्ट्रात अमरावतीमधील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची २० जूनला रात्री गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या नुपूर शर्मा प्रकरणातूनच झाली असल्याचा खुलासा अमरावती पोलिसांकडून करण्यात आला आहे.

अमरावती शहरात तहसील कार्यालयाजवळ उमेश कोल्हे यांचे ‘अमित मेडिकल स्टोअर’ आहे. मंगळवारी (२० जून) कोल्हे हे दुकान बंद करून मुलगा संकेत (वय २७) व सून वैष्णवी यांच्यासोबत वेगवेगळ्या दुचाकीने घरी जात होते. मार्गात न्यू हायस्कूल मेनजवळ हनुमान मंदिराच्या गल्लीतून घराकडे जात असताना अंधारात तिघांनी उमेश कोल्हे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली होती. या घटनेनंतर भाजपने कोल्हे यांची हत्या नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळेच झाल्याचा आरोप केला होता.

उमेश कोल्हे यांची हत्या लूटमार करण्याच्या उद्देशाने झाल्याचे अगोदर पोलिसांनी सांगितले होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना अटक केली होती. उमेश कोल्हे खून प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला. त्यात प्रथमदर्शी उमेश कोल्हे यांनी नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर जी पोस्ट केली त्याच संबंधाने हा गुन्हा घडल्याचे निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत या हत्या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती अमरावतीचे पोलिस उपायुक्त विक्रम साळी यांनी आज पत्रकारांना दिली. याबाबत नागरिक अमरावती शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करू शकतात. पोलिस सतर्क आहेत. योग्य ती कारवाई केली जाईल. या घटनेमागे कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचा हात आहे का याचाही तपास करण्यात येत आहे, असे साळी म्हणाले.

दरम्यान, नूपुर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत टिप्पणी केलेल्या पोस्ट शेअर केल्याप्रकरणी उमेश कोल्हे त्यांची हत्या केली असावी, असा संशय भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्त केला होता. नूपुर शर्मांच्या पोस्ट ज्यांनी लाईक केल्या, कमेंट केल्या, फॉरवर्ड केल्या त्या सर्वांना धमक्या आल्या आहेत. माफी मागा म्हणून या धमक्या आल्या आहेत. उमेश कोल्हे यांचे मी जे स्क्रिनशॉट पाहिले त्यातही असाच प्रकार आढळून आला. त्यामुळे त्यांच्या खुनाशी त्या गोष्टीचा संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत खा. डॉ. बोंडे यांनी व्यक्त केले होते. आता अमरावती पोलिसांनी जो खुलासा केला आहे त्यामुळे हा संशय खरा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Share