ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन; दूरदर्शनवरील बातम्यांचा बुलंद आवाज हरपला

मुंबई : दूरदर्शनचा चेहरा अशी ओळख असलेले सुप्रसिध्द वृत्तनिवेदक आणि सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांचे प्रदीर्घ आजाराने आज मंगळवारी (७ जून) मुंबईत निधन झाले. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रदीप भिडे यांनी आपल्या भारदस्त आवाजाने दूरदर्शनवर एक काळ गाजवला होता. ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन झाल्याची माहिती सह्याद्री वाहिनीने त्यांच्या ट्विटर हॅंडलवरून अधिकृतरित्या दिली आहे.

दूरदर्शवरील खणखणीत आणि बुलंद आवाज अशी प्रदीप भिडे यांची ओळख होती. मुंबई दूरदर्शन केंद्रावरून म्हणजेच आताच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून गेली चाळीसहून अधिक वर्षे ‘नमस्कार, आजच्या ठळक बातम्या’ असे सांगणारा भारदस्त आवाज प्रदीप भिडे यांच्या अकाली निधनाने हरपला आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काही वर्षे नोकरी करून त्या काळात ती सोडण्याचे धाडस दाखवलेले, नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या नाटय़संस्थेतून काही काळ नाटकांशी जोडले गेलेले आणि हजारो जाहिराती, माहितीपट-लघुपट यांचा ‘आवाज’ असलेले ज्येष्ठ वृत्तनिवेदक-सूत्रसंचालक प्रदीप भिडे हे दूरदर्शनमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले.  १९७४ ते अगदी २०१६ पर्यंत म्हणजे जवळपास ४२ वर्षे प्रदीप भिडे यांनी दूरदर्शनसाठी वृत्तनिवेदक म्हणून काम केले. भिडे यांनी राज्य आणि देशातील अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींवेळी केलेले वृत्तनिवेदन आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. गेल्या ४२ वर्षांहून अधिक काळ त्यांनी सातच्या बातम्यांमधून प्रेक्षकांना राज्य-राष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी सांगितल्या. त्यांच्या भारदस्त आणि संवेदनशील आवाजातून बातमीची धग लोकांना समजली.

भारदस्त आणि संवेदनशील आवाज
‘नमस्कार, मी प्रदीप भिडे’ असे म्हणत त्यांनी भारदस्त आणि संवेदनशील आवाजातून बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. वयाच्या २१ व्या वर्षी भिडे यांनी पत्रकार म्हणून काम करायला सुरुवात केली. दूरदर्शनच्या वृत्तविभागामध्ये अनुवादक म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. सुरुवातीपासूनच मराठी वाड्.मय, नाटके, कादंबऱ्या, एकांकिका या विषयांमधे त्यांना विशेष रुची होती. प्रसार माध्यमात करिअर सुरू करावे, असा पहिल्यापासूनच त्यांचा मानस होता.

मुंबईत खार येथे भिडे यांचे सासरे सुभाष कोठारे यांची स्वतःची एक इमारत होती. तिथे भिडे यांनी ‘प्रदीप भिडे कम्युनिकेशन’ या नावाने ध्वनिमुद्रण स्टुडिओ निर्मिती संस्था सुरू केली. पुढे त्यांनी या क्षेत्रात जम बसवला आणि स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करून जाहिराती, माहितीपट आणि लघुपट यावर आपला आवाज ठसविला.

सुरुवातीच्या काळात बहुराष्ट्रीय कंपन्यात नोकरी; नंतर दूरदर्शनमध्ये सेवा 
प्रदीप भिडे यांचे आई आणि वडील शुभलक्ष्मी व जगन्नाथ भिडे हे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून काम करत होते. विविध ठिकाणच्या शाळांमध्ये बदली होत असल्याने प्रदीप यांचे शिक्षण महाराष्ट्रातील पाच ते सहा खेडेगावांतून झाले. अकरावी एसएससी झाल्यानंतर ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आले. विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर ई मर्क आणि हिंदुस्थान लिव्हर या बहुराष्ट्रीय कंपन्यात काही काळ जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी मुंबई दूरदर्शन केंद्रामध्ये वृत्तनिवेदक म्हणून काम पाहिले. लहानपणापासूनच त्यांच्यावर भाषेचे संस्कार घरातून झाले होते. आई व वडील दोघेही संस्कृत, मराठी व हिंदी भाषेचे शिक्षक असल्याने अभ्यास, क्रमिक पाठ्यपुस्तकांबरोबरच इतर अभ्यासेतर पुस्तकांचे वाचन होतेच. शिवाय, भगवदगीतेचा पंधरावा अध्याय दररोज मोठ्या आवाजात म्हटलाच पाहिजे, असा घरातील दंडक होता. ‘विष्णुसहस्रनाम’ही म्हटले जायचे. त्यामुळे शुद्ध व स्पष्ट शब्दोच्चार व्हायला आणि ‘आवाज’ घडायला त्याची त्यांना मोलाची मदत झाली.

वृत्तनिवेदन क्षेत्रात २५ वर्षे सातत्याने अधिराज्य
प्रदीप भिडे यांच्या आवाजाने वृत्तनिवेदन क्षेत्रात २५ वर्षे सातत्याने अधिराज्य गाजवले. मुंबई दूरदर्शन केंद्राची सुरवात २ ऑक्टोबर १९७२ रोजी झाली. प्रदीप भिडे एप्रिल १९७४ पासून दूरदर्शनच्या सेवेत दाखल झाले होते. त्यावेळी भक्ती बर्वे-इनामदार, ज्योत्स्ना किरपेकर, स्मिता पाटील-बब्बर हे सारे प्रदीप भिडे यांचे समकालीन तसेच सम-व्यावसायिक सहकारी होते. संध्याकाळी साडेसात वाजता मुंबई दूरदर्शन केंद्रावरील बातम्यांची ती विशिष्ट ‘ट्युन’ सुरू झाली की, आज बातम्या द्यायला कोण येणार याची लहान मुलांमध्ये जणू स्पर्धा लागायची. भक्ती बर्वे, ज्योत्स्ना किर्पेकर, चारुशीला पटवर्धन, अनंत भावे…. अशी नावे घेतली जायची आणि आपण सांगितलेले नाव बरोबर आले की, जणू काही जग जिंकल्याचा आनंद व्हायचा. यात एक नाव असायचे सुहास्य व प्रसन्न मुद्रेचे आणि भारदस्त आवाजाचे प्रदीप भिडे यांचे. आज तो आवाज कायमचा हरपला आहे. भिडे यांच्या निधनाने दूरदर्शनचा खऱ्या अर्थाने एक महत्त्वाचा पैलू निखळला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. दरम्यान, प्रदीप भिडे यांच्यावर आज संध्याकाळी सहा वाजता अंधेरी पूर्व येथील पारशीवाडा स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.

Share