छत्रपती शिवरायांचे स्वराज्य पुन्हा एकदा निर्माण करायचेय : संभाजीराजे छत्रपती यांचा निर्धार

रायगड : हिंदवी स्वराज्य स्थापन करताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोठेही तडजोड केली नाही. पुरंदरचा तह अपमानकारक होता;परंतु तो तह त्यांनी धुडकावून लावला. जिथे आपल्यावर बंधने घातली जातात तिथे थांबायचे नसते, अशी शिवाजी महाराजांची शिकवण आहे. शिवाजी महाराजांनीदेखील परकीयांशी संघर्ष केला; पण स्वकीयांशीदेखील त्यांना संघर्ष करावा लागला. यातूनच त्यांनी स्वराज्य निर्माण केले. हेच शिवाजी महाराजांचे स्वराज्य आपल्याला पुन्हा एकदा उभे करायचे आहे, असा निर्धार संभाजीराजे छत्रपती आज किल्ले रायगड येथे व्यक्त केला.

किल्ले रायगडावर आज (६ जून) ३४८ वा शिवराज्याभिषेक सोहळा अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे मोठ्या जल्लोषात साजरा झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या शिवभक्तांना किल्ले रायगडावरील राज सदरेवरून संबोधित केले. कोरोनामुळे दोन वर्षानंतर यावर्षी प्रथमच साजरा झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवभक्त रायगडावर उपस्थित होते. या सोहळ्यादरम्यान संभाजीराजे छत्रपती काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते; परंतु मी आज राजकीय बोलणार नाही, असे स्पष्ट करत संभाजीराजे यांनी यावेळी कोणाचेही थेट नाव घेतले नाही. तथापि, अनेक ऐतिहासिक दाखले देत राज्यसभा निवडणुकीवरून आणि रायगडावरील सोयी-सुविधांवरून राज्य सरकारवर नाव न घेता टीका केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वाभिमानाशी कधी तडजोड केली नाही, असे सांगत शिवरायांचे स्वराज्य पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी सज्ज होऊया, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी शिवभक्तांना केले. सरकारने किल्ले रायगडावर शिवभक्तांच्या सोयी-सुविधांसाठी काय केले, असा प्रश्न उपस्थित करत शिवभक्तांची सोय होत नसेल तर स्वराज्याचा लढा येथूनच सुरू होईल, असा इशारा त्यांनी दिला.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, आज महाराष्ट्रात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत; पण सगळ्या महाराष्ट्राचा दौरा मी करणार आहे, तुम्हा सर्वांना भेटायला येणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यादिवशीच छत्रपती शिवाजी महाराज राजे झाले. देशाचे पहिले स्वातंत्र्य १९४७ साली नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी विस्थापित मावळ्यांना एकत्र केले आणि स्वराज्य स्थापन केले. स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवत असताना शिवाजी महाराजांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. प्रस्थापित व्यवस्था याला सुरुंग लावणार हे त्यावेळी लोकांना कळाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात अनेक पातशाही होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांना अडवण्यासाठी त्यांनी बाप-लेकात भांडण लावण्याचे ठरवले. भांडण लावताना छत्रपती शिवाजी महाराजही म्हणाले असतील की, शहाराजेंवर किती दबाव आणला गेला. घराण्यात फूट पाडण्यापर्यंत पातशाहीतील आणि प्रस्थापित लोक गेले होते, असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

आदिलशाहीने शहाजीराजेंना पत्र लिहिले होते. त्यामध्ये तुमच्या मुलाला घरात थांबवा नाहीतर आमच्यात सामील करून घ्या, असे म्हटले. यावर शहाजीराजेंनी उत्तर दिले होते, हा माझा मुलगा आहे; पण माझे काही ऐकत नाही. तुम्हाला काय करायचे आहे ते करा, मी तुमच्यासोबत प्रामाणिक आहे, असे शहाजीराजेंनी म्हटले. छत्रपती शिवाजी महाराज शहाजीराजेंना काही सांगत नसतील का? मग ते असे का म्हणाले हे मी सांगणार नाही, ते तुम्हीच शोधून काढा, शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आपल्याला काय घ्यायचे हे ठरवले पाहिजे. त्यांनी प्रस्तापितांऐवजी विस्तापितांना संधी दिली.

संभाजीराजे म्हणाले, शहाजीराजे यांनी बुद्धी कौशल्याने शत्रूला चकवून शिवाजी महाराज यांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी रान मोकळे केले. दोघांनी कधीच स्वाभिमानाशी तडजोड केली नाही. वाकायचं नाही, हा धडा त्यांनीच दिला. पुरंदरच्या तहात शिवराय दोन पावले मागे गेले. सन्मान राखला जात नाही, जिथे बंधने घातली जातात, तिथे थांबायचे नाही, हा त्यांचाच वारसा आहे. शिवरायांना कोणाचे मांडलिकत्व नको होते, असेही त्यांनी सांगितले. शिवाजी महाराज यांना मुघल दरबारात अपमानीत केले होते, त्यावेळी ते तिथून निघून गेले. आम्ही त्याच शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. आम्ही आमच्या स्वाभिमानाला जपतो. शिवाजी महाराज यांनी सांगितले होते की, जिथे आपल्या स्वाभिमानाला जागा नाही तिथे आपण थांबायचे नाही.

मी राजसदरेवरून काय बोलणार, माझ्या मनात काय दडलेय, अशी माध्यमांत चर्चा होती. राजसदर देशाला दिशा दाखविण्याचे काम करते. त्यामुळे राजसदरेवरून मी राजकीय वक्तव्य करणार नाही. महाराष्ट्रात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यात तो जखडला आहे. ते प्रश्न समजावून घेण्यासाठी राज्याचा दौरा काढून सर्वांना भेटायला येणार आहे, असे संभाजीराजे म्हणाले. ते म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे यंदाचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. शाहू महाराज जसे समाज सुधारक तसे शिवभक्तही होते. त्यांनी शिवाजी महाराज व ताराराणी यांचा रथोत्सव सुरू केला. जगातील पहिला शिवछत्रपतींचा पुतळा त्यांनीच उभारला. त्याच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला ब्रिटनच्या युवराजाला वाकवले. रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून गड संवर्धनाचे काम करत असताना राष्ट्रपतींना गडावर आणण्याचे ठरवले होते. गतवर्षी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना गडावर आणले.

यावेळी कॉन्झर्व्हेटिव्ह ऑफिसर वरुण भामरे यांचा सत्कार करण्यात आला. समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत म्हणाले, शिवभक्तांवर बंधने वाढत आहे. संभाजीराजे छत्रपती प्रत्येक मावळ्यांच्या ह्दयात असून, शिवभक्त त्यांच्या पाठीशी आहेत.

Share