राज्यात १०३६ नवीन कोरोनाबाधितांची नोंद; सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईत

मुंबई : गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याचे दिसत असून, नव्या बाधितांची संख्या हजाराच्या पुढे गेली आहे. त्यामुळे प्रशासनासह आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १०३६ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर ३७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या सात दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णसंख्या १३०.८४ टक्क्यांनी वाढली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, रायगड हे पाच जिल्हे कोरोनाचे नवे हॉटस्पॉट ठरत आहेत.

मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, रायगड या जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या आज (६ जून) झालेल्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. या पाच जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याची बैठकीत चर्चा झाली.

दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत ४ हजार ५१८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज नोंदवण्यात आलेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्णांची नोंद मुंबईत करण्यात आली असून, २४ तासांत मुंबईमध्ये ६७६ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमध्ये दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज कोरोनाच्या शून्य मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०३ टक्क्यांवर पोहोचले असून, मृत्यूदर १.८७ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. राज्यात आजघडीला ७ हजार ४२९ सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यातील सर्वाधिक ५ हजार २३८ रुग्ण हे एकट्या मुंबईत आहेत. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढताना दिसून येत आहे. या खालोखाल ठाण्याचा क्रमांक असून ठाण्यामध्ये १ हजार १७२ इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

सर्वाधिक रुग्णसंख्यावाढीचे पाच जिल्हे

  • मुंबई
    ३० मे ते ५ जून – ४८८० नवे रुग्ण
    २३ मे ते २९ मे – २०७० नवे रुग्ण
    १३५.७५ टक्के वाढ
  • ठाणे
    ३० मे ते ५ जून – १२४५ नवे रुग्ण
    २३ मे ते २९ मे – ४२७ नवे रुग्ण
    १९१.५७ टक्के वाढ
  • पुणे
    ३० मे ते ५ जून – ५३८ नवे रुग्ण
    २३ मे ते २९ मे – ३५७ नवे रुग्ण
    ५०.७० टक्के वाढ
  • रायगड
    ३० मे ते ५ जून – २४४ नवे रुग्ण
    २३ मे ते २९ मे – १०६ नवे रुग्ण
    १३०.१९ टक्के वाढ
  • पालघर
    ३० मे ते ५ जून –  १४४  नवे रुग्ण
    २३ मे ते २९ मे – ३२ नवे रुग्ण
    ३५०.०० टक्के वाढ
Share