उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे नागपुरात जल्लोषात स्वागत 

नागपूर : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडवणीस यांच्याकडे अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्रिपद आले आणि त्यानंतर आज मंगळवारी पहिल्यांदाच ते नागपुरात दाखल झाले. नागपूर विमानतळावर फडणवीस यांचे ढोल-ताशांच्या निनादात जंगी स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी केलेले जंगी स्वागत पाहून फडणवीस भारावून गेल्याचे पाहावयास मिळाले.

दरम्यान, विमानतळाबाहेर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, नागपूरकरांनी माझ्यावर नेहमीच प्रेम केले आहे. नागपूरकरांनी नेहमीच मला साथ दिली आहे. पाच वेळा मला आमदार केले आहे. दोन वेळ नगरसेवक म्हणून आणि महापौर म्हणून माझ्यावर विश्वास दाखवला आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मी आज पहिल्यांदा नागपूरला आलो असता प्रेम व्यक्त करण्यासाठी हजारो लोक जमले आहेत. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आज मी जो काही आहे ते त्यांच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे आहे. आज माझ्यावर एक मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे. ती योग्य प्रकारे पार पाडण्याचा संकल्प मी केला आहे. नवे सरकार सामान्यांच्या हिताचे निर्णय घेईल. विदर्भाला आता चिंता करायचे काम नाही. मागास भागांचा विकास करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे फडणवीस म्हणाले.

मी लगेचच कामाला लागणार
राज्यात जोरदार पाऊस पडत आहे. कोकणात मुसळधा पाऊस कोसळत आहे. तेथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. परिस्थिती हातळण्यासाठी आदेश दिलेले आहेत. मी पूरस्थितीचा आढावा घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आढावा घेतला आहे. त्यांनीही प्रशासनाला आदेश दिले आहेत. जल्लोष आहे. मात्र, जबाबदारीची जाणीव आहे. मी लगेचच कामाला लागणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर विमानतळावर आज सकाळी ११.३० वाजता आगमन झाले. यावेळी ढोल-ताशाच्या निनादात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. विमानतळावर स्वागत केल्यानंतर फडणवीस यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माजी मंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे नेते, पदाधिकारी तसेच फडणवीस यांचे हजारो चाहते उपस्थित होते. फडणवीस यांच्या स्वागतासाठी विमानतळापासून दुचाकी रॅली काढण्यात आली. त्यात भाजप तसेच भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही मिरवणूक हॉटेल प्राईड चौकात आल्यानंतर तेथे फटाक्यांची आतषबाजी करत फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे फलक लागले आहेत. मिरवणूक धरमपेठ येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर तेथे जाहीर सभा होणार आहे.

पक्षासाठी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्याने त्यांच्यावर भाजप नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत असतानाच नागपुरात फडणवीस यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती.

Share