उद्धव ठाकरेंभोवती असणाऱ्या ‘त्या’ चार लोकांमुळेच कालपर्यंत तुम्ही सत्तेत होता : खा. संजय राऊत

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याभोवती असणाऱ्या ‘त्या’ चार लोकांमुळेच कालपर्यंत तुम्हाला सत्ता मिळाली होती. हे चार लोक सतत पक्षाचेच काम करत होते. आजही हे चार लोक पक्षाचेच काम करत आहेत. गेली अडीच वर्षे तुम्ही सत्तेत होता. त्यापूर्वीही तुम्ही सरकारमध्ये होता. आज तुम्ही ज्या चार लोकांना बदनाम करत आहात, ते शिवसेनेचे निष्ठावंत आहेत, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांना ठणकावून सांगितले. मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्या बंडखोर आमदारांकडून खा. संजय राऊत यांना लक्ष्य करण्यात आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याभोवती असणाऱ्या चार डोक्यामुळे पक्षाचे वाटोळे झाले, असा बंडखोर आमदारांचा सूर होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूच्या लोकांमुळे शिवसेनेची ही अवस्था झाली, अशी टीका शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी काल विधानसभेच्या विशेष अधिवेशनात केली होती. या टीकेला खा. संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

याप्रसंगी खा. संजय राऊत म्हणाले, बंडखोर ज्या चार लोकांची नावे घेत आहेत त्या चार लोकांमुळेच तुम्हाला कालपर्यंत सत्ता मिळाली. ते जे कुणी चार लोक म्हणत आहेत ते सतत पक्षाचेच काम करत होते. आजही पक्षाचेच काम करतात. गेले अडीच वर्षे ते बंडखोर सत्तेत राहिले, त्याआधीही राहिले, तेव्हाही हे चार लोक ज्यांना तुम्ही आज बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात हे पक्षाचे निष्ठावान आहेत.

उद्धव ठाकरे हे काही दुधखुळे नाहीत. ते बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. उद्धव ठाकरे हे स्वत:चे निर्णय स्वत: घेतात. जाणाऱ्यांना फक्त बहाणा हवा असतो. त्यांना पळून जायचे असते तर ते काहीही कारण शोधतात. तुम्ही आता पक्षातून निघून गेले आहात, तर ठीक आहे; पण आता कारणे सांगू नका. आता मंत्री झाला आहात, आता मंत्र्याचे काम करा, अशा शब्दांत संजय राऊत यांनी बंडखोरांना सुनावले.

शिंदे गटाकडून आलेल्या नोटीसवर संजय राऊत म्हणाले, ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यामुळे त्यांना नोटीस देऊ द्या. आदित्य ठाकरे यांना सोडून का नोटीस दिल्या हे मला माहिती नाही. जे म्हणतात की, बाळासाहेब ठाकरे यांचा आदर असल्याने आदित्य ठाकरे यांना नोटीस दिली नाही त्यांनी लक्षात ठेवावे, जे इतर १४ आमदार आहेत तेही बाळासाहेब ठाकरे यांचेच शिवसैनिक आहेत.

यावेळी खा. संजय राऊत यांनी शिवसेना आगामी काळात महाराष्ट्रात १०० पेक्षा जास्त आमदार निवडून आणेल, असा दावाही केला. सध्याच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रातील लोकांच्या मनात जी चिड पाहायला मिळत आहे, ते पाहता आगामी काळात शिवसेनेचे १०० हून अधिक आमदार विजयी होतील. आमदार सोडून गेले म्हणजे मतदार गेले, असा अर्थ होत नाही. एकनाथ शिंदे हे काल बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर जाऊन नतमस्तक झाले असले तरी इतिहासात त्यांची नोंद वेगळ्या पद्धतीने होईल. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा करण्याचा प्रयत्न केला, असेही राऊत यांनी सांगितले.

आम्हाला डुक्कर म्हणता, अहो, याच डुकरांची मतं घेऊन खासदार झालात : आ. गुलाबराव पाटील
दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी काल विधानसभेच्या विशेष अधिवेशनात खा. संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली होती. आम्ही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली या गोष्टीचे आम्हाला दु:ख आहे. ही गोष्ट आमच्या मनातही सलत आहे; पण उद्धव ठाकरे यांच्याभोवती असलेल्या चार लोकांच्या कोंडाळ्याने त्यांना बावळट बनवले आहे. ज्यांची निवडून यायची लायकी नाही, ते आम्हाला बोलतात. आमच्या मतांवर खासदार होतात, अशा शब्दांत आमदार गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आम्ही ‘मातोश्री’वर गेलो. त्यावेळी आम्ही म्हटले की, एकदा एकनाथ शिंदेंची बाजू ऐकून घ्या. तेव्हा संजय राऊत यांनी म्हटले की, तुम्हालाही तिकडे जायचे असेल तर जा. आम्हाला गटारातील घाण, डुक्कर म्हणून हिणवले गेले. ज्यांची लोकांमधून निवडून यायची लायकी नाही, ते आम्हाला बोलतात. आम्हाला डुक्कर बोलता आणि आमच्याच मतांवर खासदार म्हणून निवडून जाता. हे कोण सहन करणार?,असा सवाल आ.पाटील यांनी संजय राऊत यांना विचारला होता.

Share